राष्ट्ररथाला विजयी व्हाया समबल चक्रे दोन हवी
बज्रासम दृढनिश्चय आणिक बिजली सम समशेर हवी ।। धृ. ।।
समाजपक्ष्या, नभ जिंकाया पंखहि तुजला दोन हवे
गती हवी तुज, दिशा हवी अन् अमोघ ऐसे धैर्य हवे ।। १ ।।
जीवन-अंकुर रुजुनी येण्या, सूर्यकरांची ऊब हवी
आणि त्याच्या भरण पोषणा माय मातिची प्रीत हवी ।। २ ।।
वादळवाऱ्यापासून जपण्या, कणखर, वत्सल हात हवे
दीपज्योतिला सुतेज करण्या अमृत हृदयातील हवे ।। ३ ।।
रणभेरींचा घोष हवा अन् मुरलीचा स्वरस्पर्श हवा
दुष्टविनाशी शौर्यालागी ममतेचा आशीष हवा ।। ४ ।।
शंकर करितो तांडव आणिक नृत्य देविचे लास्य असे
जगताच्या या मायपित्यांचे अपूर्व ऐसे ऐक्य असे ।। ५ ।।
कोण श्रेष्ठ हा वाद कशाला? जग तर दोघांचे घडले
शिवशक्तीची गुंफण होऊन विश्वरूप दिसते सजले ! ।। ६ ।।