काशूर भाषेतील रामावतारचरित–कश्मीरी रामायण

लेख क्र. ५३

१६/०८/२०२५

रामकथा भारतीयांसच नाही तर जगासही ज्ञात आहे. परंतू त्या कथेत स्थळ-काळानुसार काही बदल आपल्याला दिसून येतात. संत्रिकेत खूप मोठा व विविध रामायणे असलेला संग्रह आहे. त्या संग्रहातील पंप रामायण व मोल्ल रामायणाची माहिती आपण मागील लेखांमध्ये बघितली. आज आणखी एका वैशिष्ट्यपूर्ण रामायणाची माहिती येथे देत आहोत ते म्हणजे काशूर भाषेतील ‘रामावतारचरित’ म्हणजेच कश्मीरी रामायण. संत्रिकेच्या विभागप्रमुख डॉ. मनीषा शेटे यांनी या ग्रंथाचा अभ्यास केला व त्यावर माहितीपर लेख लिहिला आहे. भारताला स्वातंत्र्य मिळाल्यापासून कश्मीर हे भारताचे नंदनवन धगधगते झालेले आहे. आजही तिथले राष्ट्रीयत्वाचे प्रश्न उसळी मारून वर येताना दिसतात. यासर्व पार्श्वभूमीवर भारतीय संस्कृतीचे प्रतिबिंब दर्शविणारे तिथले साहित्य नक्कीच अभ्यासायला हवे. ‘काशुर’ भाषेतील ‘रामावतारचरित’ हे अशा कश्मीरी संस्कृतीचे वहन करते. या रामायणातील भाषेवर नंतरच्या काळातील फारसीचाही प्रभाव दिसून येतो.

शेरास लागाय पोश लवु हितयें सतिये वोतुये व्यवाह काल। शोक्लम करिथ ओम शब्दु सतिये वीद शास्त्र द्रायि रत्य रत्य गोन। वोलबा वरनख महागनुपतिये सतिये वोतुये व्यवाह काल ॥ – तुझ्या मस्तकावर दवबिंदूंनी मुक्त ताजी फुले माळूया, सीते तुझा विवाह काळ समीप आला आहे. या शुभयोगावर ओंकारासहित वेदशास्त्रांची मंगलवाणी निनादत आहे. वराची निवड करण्यास जणू महागणपती पण आले आहेत. हे सीते तुझा विवाह काळ समीप आला आहे.

कश्मीरी संस्कृतीचे विलोभनीय चित्र रेखाटलेले हे राम सीतेचे विवाह गीत ‘रामावतारचरित’ या कश्मीरी रामायणातील आहे. वाल्मीकी रामायणाने भारतभर प्रवास केला तेव्हा त्यामध्ये साहजिकच जानपदीय संस्कृतीचे रंग मिसळत गेले व रामायणाचा गाभा जरी तसाच राहिला तरी रामायणाची अभिव्यक्ती बदलत गेली. मूळ वाल्मीकी रामायणात राम-सीतेच्या विवाहाचे वर्णन येते, तसे ते प्रादेशिक भाषांमध्ये भाषांतरित झालेल्या रामायणात येत नाही. स्थानिक प्रथा परंपरांचे आल्हादक मिश्रण भाषांतरित रामायणात पाहायला मिळते. ‘काशुर’ भाषेतील ‘रामावतारचरित’ हे कश्मीरी संस्कृतीचे वहन करते.

१९व्या शतकापर्यंत कश्मीरी मध्ये रामकथेपेक्षा कृष्णकथा अधिक दिसते. त्यानंतर मात्र रामावतारचरित, शंकर रामायण, विष्णुप्रताप रामायण तथा शर्मारामायण असे ग्रंथ निर्माण झाले. यातील ‘रामावतारचरित’ हे अधिक प्रसिद्धीस पावले. कुर्यग्राम निवासी प्रकाशराम यांनी इ.स. १८४७ मध्ये या ग्रंथाची रचना केली. भगवती त्रिपुरसुंंदरीच्या कृपाप्रसादाने त्यांना वाक्चातुर्य प्राप्त झाले अशी कथा सांगितली जाते. रामावतारचरित एक प्रबंध काव्य आहे, ज्यामध्ये भक्तिरसपूर्ण रामकथा गायली गेली. हा ग्रंथ पद्यस्वरूपात आहे. वाल्मीकी रामायण व अध्यात्म रामायणावर आधारित या ग्रंथात सात कांंड आहेत व अंती लवकुश-चरित भाग जोडलेला आहे.

अध्यात्म रामायणात रामकथा शिवपार्वतीच्या संवादाने सुरू होते. राम परमात्मा व सीता ही प्रकृती रूपात गौरविलेली आहे. ‘रामावतारचरित’मध्येही शिव-पार्वती संवादाने सुरुवात होते परंतु पहिल्या ५४ कडव्यांमध्ये रामायणातील व्यक्तिरेखा रूपकात्मक रंगविलेल्या आहेत. रामायण म्हणजे व्यक्तिजीवनाचा प्रवास उत्तम ध्येयाकडे घेऊन जाणारा मार्ग आहे. सत्याचरणी व्यक्तीची सु-इच्छा सीता आहे. सत्याचा सेतू राम व लक्ष्मण आहे, धीर किंवा हिंमत हनुमान आहे तर असत्य म्हणजे रावण आहे. म्हणून रावणाचे सारे वैभव इथेच राहिले. वैराग्यपूर्वक आत्मज्ञानरूपी धारदार तलवारीने असत्य असुररूपी रावण नष्ट करायचा आहे. रावणवध म्हणजे शुभवासनेने अशुभ
वासनेचा केलेला वध आहे. हे वर्णन करताना व्यक्तीचे जीवन म्हणजे ‘तुझे शरीर हे इष्टदेवतेचे गृह असून तू पूजारी होऊन त्याचे रक्षण कर म्हणजे राक्षस वृत्ती त्यावर आरूढ होणार नाही. अन्यथा रावण म्हणजे वाईट इच्छा वासना ह्या इष्ट देवतेचे गृह अपवित्र करेल. अहंकाराचा त्याग कर, मनरूपी मंदोदरी तुझी वाट पाहत आहे. मनाचा आरसा सत्यरूपी राखेने स्वच्छ कर तेव्हा तुला चतुर्भज रामाचे दर्शन होईल व मुक्ती मिळेल. गुरूने जो सत्पथ तयार केला आहे तो म्हणजे ‘रामावताराची’ ही कथा.

या रामायणातील प्रकाशराम कुर्यग्रामी यांची कश्मीरी भाषा, कश्मीरी श्रुती परंपरा व भक्तिरस यांनी युक्त आहे. यात लयबद्धता आहे पण कश्मीरी भाषेचे प्रकटीकरण मात्र विशेष समजून घेण्यासारखे आहे. या भाषेची मूळ लिपी शारदा हळूहळू लुप्त होत गेली. १४ व्या शतकानंतर मुस्लिम शासनकाळात फारसी राजभाषा झाली व कश्मीरी भाषेसाठी फारसी लिपीचा उपयोग सुरू झाला. शारदा लिपी एका अर्थाने पंडित व पुरोहितांची राहिली. उर्दू, अरबी, पंजाबी, डोगरी या भाषांंचा प्रभाव वाढत गेला. कश्मीरमध्ये या भाषेला ‘कशीर’ अथवा ‘काशुर’ म्हटले जाते. डॉ. शिबनकृष्ण रैना या ज्येष्ठ अभ्यासक, अनुवादकाने मूळ लेखक प्रकाशराम यांच्या
संस्कृतनिष्ठ भाषेतील फारसी शब्दांची विपुलता व त्याला जोडून येणार्‍या ग्रामीण शब्दप्रभावाचा उल्लेख केला आहेच. पण रामावतारचरिताच्या हिंदी भाषांतरात सुद्धा गमख्वार, तदबीर, शमशीर असे शब्द सहज आले आहेत. उदा:- रावण ने कहा – “मेरी बात यदि मानते नहीं हो तो तुम्हे शमशीर से मार डालूंगा!” किंवा सीताहरण प्रसंगी सुरुवातीला लक्ष्मण रामाला शोधायला जाण्यास नकार देतो तेव्हा सीता उद्वेगाने लक्ष्मणाला म्हणते ‘अब मुझे मालूम हो गया कि तेरे दिल में खाम खयाल है। (तेरी नियत ठीक नहीं). शोर शराबा, गुलशन,बुरका, गुनाह बक्शना, तदबीर-उपाय, कारनामें, ईश्वर की मंशा (ईश्वरेच्छा), हनुमान को मुबारख बात देना अशा वाक्यांची व शब्दांची रेलचेल रामावतारचरितामध्ये दिसते व ते कुठेही वाचताना खटकत नाही. सूर्योदय होतोय व रात्र समाप्त होत आहे याचे वर्णन करताना, प्रभात रात्रीला म्हणते की आता तुझे मुख लपव (‘बुथिस तुम बुरक द्युत तमि लोग दरबार’) म्हणजे ‘वह मुहपर बुरका पहनकर कार्यकलाप करने लगी।

या संमिश्र भाषेप्रमाणेच स्थानिक संस्कृतीचे दर्शन यात होते. याचे सुंदर उदाहरण म्हणजे राम-सीता विवाह संस्कार चित्रण. विवाहाचा दिवस आला आणि विवाहगीताने सुरुवात झाली. विवाहाच्या प्रसंगी अनेक सुंदर लोकगीते म्हणण्याची परंपरा भारतभर दिसते. ‘येनि दाल्युक ग्यबुन’ सगळे ‘बाराती’ जमले आणि त्यांनी गायला सुरुवात केली ‘शाम रूप राम गछि सीताये’ म्हणजे शाम रूप राम सीतावरण करण्यास निघाले. या गाण्यामध्ये कश्मीर मधील स्थानिक देवदेवतांची नावे आली आहेत. सरस्वती, हिंगुला, विजया, पिंगला, मंगला, शारदा, उत्रस गावची उमा, लक्ष्मी, रुपभवानी, कालिका, शीतला, तोतला, गायत्री, सावित्री, त्रिसंध्या, जलन गावाची देवी,पवनसंध्या, लोदरसंध्या, बरगुशिखा या देवतांनी रामाला आभूषणे दिली व विवाह सोहळ्यात सहभागी झाल्या.

श्रीरामाची अशी भव्य वरात निघाली आहे आणि दुसरीकडे सीता विवाहासाठी तयार होत आहे. तिच्यासाठी सुद्धा लग्न गीते म्हणली जातात ‘लगनुक ग्यवुन’. तिच्या केसांमध्ये फुल माळत असताना ही गाणी म्हणली जात आहेत. ताज्या फुलांना फार सुंदर शब्द इथे वापरला आहे, ‘ओस-सिक्त’-दवबिंदूंनी सजलेली फुले. सीतेला ‘सतिये असे संबोधून सार्‍याजणी गातात, ‘विवाह वेळा जवळ आलीये सीते!’ तिला आशीर्वाद द्यायला महागणपती, विजया सरस्वती जमुना, शारदा, भूतेश्वर राज्ञी, हिंगुल, मंगला, भद्रकाली आल्या. कोणी तिच्या पावलात सुवर्ण पैंजण बांधत आहेत. ब्रह्माजींनी स्वतः द्वारपूजा केली, ज्वाला, लंबोदर, गणपत यांनी पाम्पोर गावात केसरची वाटिका लावली. विवाहाच्या निमित्ताने धान्य पेरणे, ते वराकडे घेऊन जाणे ‘अंकुरारोपण’ विधी किंवा तुळशीचे रोप अशा स्थानिक परंपरांचे पालन आजही केले जाते त्याचेच हे जणू प्रतीक… बालुहाम, अकिनगाम उत्रस, वासुकुर अशा सर्व ठिकाणाहून आलेल्या देवतांनी जनकाचे विवाहघर जणू गजबजून गेले आहे.

कश्मीरी विवाहात शेवटी वधूवरांवर मंगलगान करत पुष्पवृष्टी करतात त्यासाठी राजकुमारीची फुलांनी पूजा करावी म्हणून देवता फुलांचे भांडार जमवीत आहेत.’ ‘लायबोय’ व ‘गंगव्यस’ हे कश्मीरी विवाहातील विशेष कृत्य वधूकडील बालक बालिका संपन्न करतात त्याही विधीचा येथे उल्लेख आला आहे.

कश्मीरी रामायणातील रामविवाहानंतर येणारे रामचरित्र वाल्मीकी रामायणाप्रमाणे पुढे जात राहते. काही महत्त्वाच्या प्रसंगांचे चित्रण मात्र वेगळ्या रीतीने केलेले दिसते. त्यात श्रावणवधाची पूर्वकथा आहे. नंतर रामाचे वनवासात जाणे आहे, वसिष्ठ दशरथाची समजूत घालत आहेत की रावणवध करण्यासाठीच हा रामावतार आहे सीताहरण होणे व त्यानिमित्ताने लंका नष्ट होणे ही जणू रामावतारातील नारायणाची इच्छा आहे. सीताहरणात दोन प्रसंग निराळ्या रीतीने आले आहेत एक म्हणजे रावण- जटायू युद्ध, या युद्धात रावण जटायूचे पंख कापतो तेव्हा सीता रावणाला म्हणते, ‘हा तुला कधीच सोडणार नाही.’ तेव्हा रावण सीतेला धमकी देतो की याला कसे मारायचे सांग नाहीतर तुझा वध करतो. तेव्हा सीतेनेच जटायू कसा मरेल याविषयी रावणाला सांगितले आणि जटायूचा काळ आला. ‘रक्ताने भिजलेल्या दगडांचा वर्षाव जटायूवर कर तो ते गिळून टाकेल व तुझ्या मागे येऊ शकणार नाही’. परंतू रामाला माझ्याविषयी सांगितल्याशिवाय त्याचा मृत्यू नाही हे पण ती बजावून सांगते.

दुसरा प्रसंग म्हणजे अशोकवनात मंदोदरी सीतेला पाहते आणि तिला तिच्या आयुष्याचा पूर्वार्ध आठवतो. मीच ह्या बालिकेला पाण्यात सोडून दिले! मंदोदरीच्या हृदयातून वात्सल्याचे झरे पाझरू लागतात, पण ती कठोरपणे आपल्या वाणीवर निर्बंध घालते. माझ्याच कुशीतून हिने जन्म घेतला आणि आता हिच्यामुळे लंकानाश होणार, कारण रावणाने स्वतःच्याच पुत्रीवर कुदृष्टी ठेवली. ‘विधीला’ उद्देशून मंदोदरी म्हणते, ‘तू हे काय दुर्भाग्य लंकेच्या भाळी लिहिलेस? पुन्हा एकदा तुझी लेखणी उचल व काही शुभ लिही. सीता ही मंदोदरी व रावणाची कन्या दर्शवली आहे.

कथानक पुढे सरकत जाते, रामसेतूचा प्रसंग येतो. हनुमान अशोक वाटिकेत भेट देऊन येतो तेव्हा राम त्याला जे प्रश्न विचारतो ते अगदी विलक्षण आहेत. तो विचारतो, ‘माता पित्यांची ही लाडकी कन्या असे म्हणाली का की कुठल्या मुहूर्तावर माझा जन्म झाला व माझ्यावर ही वेळ आली? आपल्या आईला तिने सासूविषयी तक्रार नाही ना केली की विवाहवस्त्राऐवजी हे भूर्जवस्त्र माझ्या नशिबात आले! (अशोकवनातील सीता तिच्या आईशी कसा संवाद साधू शकेल हा मुद्दा येथे गौण ठरतो!) मला ती विसरून गेली का? असे झाले असेल तर तिलाच दोष लागेल. पुढे राम हनुमानाला म्हणतो, तू तिला सांगितलेस का सासरची गोष्ट माहेरी सांगणे योग्य नव्हे, त्यामुळे पतीला मान खाली घालावी लागेल. मला एकटीला सोडून राम शिकारीला गेला असे तर नाही ना सांगितले तिने? हे असे तिचे वागणे म्हणजे तिने विनाशाला आवाहन केले आहे. आता इथे मर्यादापुरुषोत्तम रामाच्या तोंडी घातलेले संवाद मूळ कथेपासून भरकटतात पण लेखकाच्या आजूबाजूच्या सामाजिक पुरुषप्रधान संकेतांचे दर्शन करतात. अर्थातच हनुमान हे सर्व नाकारतो व सीतेची करूण कहाणी रामाला सांगतो.

लंकेत जाण्यासाठीचा ‘सेतूबंधन’ हा रामायणातील विशेष नाट्यमय प्रसंग. दगडांचे पाण्यावर तरंगणे कशामुळे घडले ते रामावतारचरितामध्ये वेगळ्या प्रकारे येते. राम इथे वरुणाला विनंती करतो (सागराला नाही!) पण तो प्रतिसाद देत नाही असे लक्षात आल्यावर त्याला तीर चालविण्याची धमकी देतो, तेव्हा वरुण त्यांची समजूत काढतो व एक कथा सांगतो. ही कथा नाविन्यपूर्ण आहे. ‘त्या परिसरातील धोब्याला, जो ऋषी, संन्यासी यांची वस्त्रे धुवायचा, त्याला नल नावाच्या वानराने धमकावले की तू माझीही वस्त्रे धू किंवा या वस्त्रांतील काही वस्त्रे मला दे नाहीतर तुझा धुण्याचा दगड पाण्यात बुडवतो जो तुला मिळणारच नाही. तो धोबी तेव्हा साधूंना शरण गेला व स्वतः चे दुःख सांगितले. ऋषींनी नलाला शाप दिला की तू जो दगड पाण्यात टाकशील तो पाण्यावर नावेप्रमाणे तरंगेल.’ हा शाप अजूनही असल्याने नल जे समुद्रात टाकतो ते पाण्यावर तरंगते व असा हा नल तुझ्या सैन्यात आहे त्याचा तुला उपयोग होईल. नलामुळे चाळीस दिवस लागणारे काम तीन दिवसात पूर्ण झाले.

यानंतर अनेक उपकथानके आली आहेत. राम-रावण युद्धात रामाचा विजय होतो. राम-सीता अयोध्येला परततात व रामराज्याची सुरुवात होते. यानंतर लव-कुश कांड आहे. धोब्याचे बोल ऐकून राम सीतेचा त्याग करतो हा प्रसंग इथे पूर्ण बदलला आहे. इथे रामाचा ‘शहंशाह’ असा उल्लेख केला आहे. प्रसंग असा आहे की दुपारच्या निवांत वेळी सीतेची एक छोटी नणंद(?) तिच्याशी गप्पा मारते (सीतेचे व तिचे वैर आहे! नणंद भावजयीचे कटू नाते! तत्कालीन समाजातील प्रतिबिंब म्हणावे का?) सीतेला ती विचारते, ‘मला सांग दशमुख रावण कसा दिसत होता?’ आता इथे नणंदेशी आपले नाते पाहता सीतेने तिला काही सांगायला नको होते पण तिचा सरळ स्वभाव व स्त्रीसुलभ भावना, त्यात आता सुखासीन जीवनाची पडलेली भर त्यामुळे सीतेने रावणाचे मुख चित्रित केले. पण नणंदेने घात केला आणि सर्व वृत्त रामापर्यंत पोहोचले व सीतात्याग झाला. त्यावर लेखक म्हणतो की, सीतेने हे स्वतःच ओढवून घेतले, ज्यामुळे पुत्रांना जन्म देऊन ती जणू पृथ्वीमातेकडे परत जाऊ पाहत होती? पुढे सीतेचे धरणीशी एकरूप होऊन व रामाचे स्वर्गारोहण होऊन लवकुश आख्यान संपते.

रामायणाच्या शेवटच्या टप्यात अध्यात्मिक भावना व्यक्त झाली आहे. सीता रामावर रुष्ट असली तरी ती म्हणते मी राममय झाले आहे. विक्रम संवत् १९०४ मध्ये रामावतारचरित पूर्ण केले असे प्रकाशराम कुर्यग्रामी यांनी नोंदवले आहे (इ. स. १८४७). पुढे लेखकाने नोंदवले आहे की, रामायणातील सीता कश्मीर मधील शंकरपूर नावाच्या गावी भूमिगत झाली तिथून एका कोसावर त्याचे जन्मगाव कुर्यग्राम आहे. त्याने ही जागा पाहिली आहे, जिच्या जवळ एक छोटा झरा आहे.

असे हे विशेष आणि थोडे निराळे कश्मीरी रामायण नक्कीच वाचनीय आहे!

संत्रिकेतील रामायण संग्रहाचे १९९२, २००१ व २०२४ मध्ये प्रदर्शन भरविले गेले. त्यातील २०२४ मधील प्रदर्शन भव्य होते. त्याची काही छायाचित्रे खाली दिली आहेत.