सोनियाचा दिवस दारी

सोनियाचा दिवस दारी, शतक अर्धे सरुनि जाई
जागृतांचे गीत हे, संजीवनाचा मंत्र गाई ।। ध्रु. ।।

जाहले ते बिंदुवत् अन् सिंधुवत् आहे समोरी
ठाकता आव्हान, स्फुरते शौर्य पंखांना भरारी
वेधिका दृष्टी उद्याच्या नवयुगाचे स्वप्न पाही ।।१।।

मापुया अवकाश आणिक शोधु या अणुगर्भ ऊर्जा
मानवातच माधवाची बांधु या सानन्द पूजा
अमृताचे कुंभ ओतू लोकगंगेच्या प्रवाही ।।२।।

जोवरी सुकल्या मुखी त्या जीवनाची धार नाही
जोवरी शिणल्या जिवाला स्नेहमय आधार नाही
व्यर्थ तोवर स्वर्ग साती, व्यर्थ सगळी रोषणाई ।।३।।

रूप चित्ती मातृभूचे, कर्मपूजा मांडलेली
चेतनेची कोटिरूपे, एकसूत्री जोडलेली
सर्वही आपण प्रबोधक, मग उणे भाग्यास काही? ।।४।।