हसरी शतवर्षे जयगान

उन्नत आत्मा, प्रसन्न मानस, शरीरही बलवान्
श्रवणवचन दृष्टीसह हसरी शतवर्षे जयगान,
हसरी शतवर्षे जयगान ।। ध्रु. ।।

समग्र रूचकर चौरस देशी हितकर नित्याहार
स्वयंश्रमाने देह चपळ अन् बळकट जे करणार
कुपथ्य चंगळ व्यसनांनी नच बाधित पंचप्राण ।। १ ।।

मैत्री करुणा मोद उपेक्षा शम दम मृदु उद्‌गार
सुखमय सहजीवन जनगणही जिवापार जपणार
प्रांजळ निर्भय निर्णायक मन संतत नवनिर्माण ।। २ ।।

हसत, गात, नवकल्प रचित जे सकलांसह जगणार
विश्वाच्या कर्त्याधर्त्याशी तन्मय जे होणार
नव्या पिढीचे नित्य जयिष्णू सर्वलोकसन्मान ।। ३ ।।

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *