नव्या युगाचे पाइक आम्ही तारे नवक्षितिजावरचे
निजरुधिराची आण वाहुनी रूप पालटू देशाचे ।। ध्रु. ।।
आद्यकवींनी चित्रियलेली भूमी ही सुजला सुफला
रूप तियेचे आज पाहुनी चीड चेतवी चित्ताला
सुजल-सुफलता पुन्हा निर्मिण्या कोटि कोटि व्यापू गगने
भागिरथीला प्रसन्न करण्या वाहू यत्नांची सुमने
घराघरातून मनामनातुन दीप चेतवू स्फूर्तीचे ।। १ ।।
यंत्रदेव तो पूज्य अम्हाला पूज्य अम्हाला वेदऋचा
विज्ञानावर भक्ति असुनही गंध मोहवी काव्याचा
पूजनीय तो उंच हिमालय पूज्य अम्हाला सागर हा
भव्यत्वाची साक्ष ज्यामध्ये पूजा त्याची करू महा
या सर्वांच्या पूजांमधुनी पूजन करू या शक्तीचे ।। २ ।।
समोर मूर्ती मातृभूमिची आज न काही प्रिय दुसरे
शुद्ध मनाचे कोंदण करुनी तिच्या रुपाचे जडवू हिरे
स्वयंप्रकाशित अम्ही काजवे दुष्ट ग्रहांवर मात करू
आकांक्षांच्या पूर्तीसाठी मृत्यूशीही होड धरू
त्यागपत्र हे आजच लिहिले अवघ्या जीवनपुष्पाचे ।। ३ ।।