नजरेपुढती वाटा खडतर हाताशी केवळ निर्धार
स्वप्न उद्याच्या उजळ दिसांचे जिद्दीने करुया साकार ।। ध्रु. ।।
अजुनी अंधाराच्या डोही खोल बुडाले दिवे किती
गाळामध्ये कितीक रुतली चाके त्यांची नाहि मिती
परिस्थितीचे शाप असे हे कधी न रोखू मज शकणार ।। १ ।।
पिढ्यापिढ्यांचा नसे वारसा, नसती नमुने वा आधार
मनी भूक मोठ्याच यशाची मनात केवळ हाच विचार
मोह भोवती कितीही असु दे नेइन माझी नैय्या पार ।। २ ।।
माझ्याशिच स्पर्धा ही माझी, समाधान आनंद मनी
कुणी दिलेल्या आधाराची जाणिव हृदयी क्षणोक्षणी
उभी पाठिशी मूक माऊली जिने उपसले कष्ट अपार ।। ३ ।।
परिस्थितीच्या अन्यायाचा पूर्ण उमलणे हा प्रतिकार
कशास डंका, कृतीच बोले, मी माझ्यासम घडविन चार
कृतज्ञतेचे फळ आकस्मिक नशीब माझे फळफळणार ।। ४ ।।