आज प्रचीती द्या !

गिरिकुहरातिल गर्द बनातिल सिंहाच्या छाव्यांनो,
तिमिरपुरातिल कृष्णघनातिल तेजस्वी ताऱ्यांनो,
प्रलयंकर शक्तीची तुमच्या आज प्रचीती द्या
तुमच्या शुभकर सामर्थ्याची आज प्रचीती द्या ।। ध्रु. ।।

मूक मनांच्या कारागारी धुमसत जी चिनगारी
वीज होउनी कोसळु दया ती उद्धत अंधारी
त्या भस्मातुन बहरुन येइल हिरवा स्वर्ग उद्या ।। १ ।।

शतकांपूर्वीची जयगीते अजुनि घुमत कानी
शतकांपूर्वी अखिल धरेला क्षेम दिले आम्ही
ते सळसळते पौरुष फिरुनी नसांत वाहू द्या ।। २ ।।

पवित्र मूर्ती प्रिय आईची दुभंग परि झाली
अमित संपदा अतुल वैभवे कुटिलांनी लुटली
गतकालाचे विषाद गौरव भविष्य घडवू द्या ।। ३ ।।

सर्व दिशांनी विकसित होवो व्यक्तिमात्र येथे
सर्वार्थांनी रत्नवंत हो क्षेत्रक्षेत्र येथे
या भूमीला सृजनांची नभपंखी स्वप्ने द्या ।। ४ ।।

समर्पणाची हाक जयांच्या हृदयाला कळली
अजिंक्य झाले राष्ट्र तयांचे अभेदय बलशाली
सार्थकतेच्या परिसाने त्या जीवन उजळू द्या ।। ५ ।।