विश्वास हा मनीचा

विश्वास हा मनीचा सांगू उभ्या जगाला
आम्ही रवी उद्याचे, अंधार भेदण्याला ।। ध्रु. ।।

अन्याय, भ्रष्टतेला अमुच्या जगी न थारा
जे जे अनाथ त्यांना पंखात ह्या निवारा
जाणून मंत्र घेऊ द्रष्ट्या ऋषीवरांचा
देवत्व त्यात पाहू जो दीन गांजलेला ।। १ ।।

उधळून मेघ टाकू जलहीन गर्जणारे
घडवू सशक्त बाहू अविराम कष्टणारे
हा कोण? जात कुठली? खोडून छाप सारे
स्नेहार्द्र साद घालू साऱ्याच बांधवांना ।। २ ।।

उन्मत्त धाक कधि ना ढळवेल निश्चयाला
भुलवील ना धनाची राशी समर्पणाला
वज्रास भेदणारी उभवू अभिन्न हृदये
सामर्थ्य मेळवू या काळास जिंकण्याला ।। ३ ।।

ज्ञानासवेच तोलू विज्ञान स्रोत आम्ही
नवनिर्मितीस लागू स्मरणात ठेवू आम्ही
चारित्र्य शुद्ध भावा फुलवून अंतरंगी
सुकुमार चित्तपुष्पे अर्पून मातृभूला ।। ४ ।।