हिंदु ऐक्याची ध्वजा….

या निळ्या मोकळ्या अंबरी विहरते
सूर्यकन्येपरी हिंदु ऐक्याची ध्वजा ।। ध्रु. ।।

आर्षकालातुनी आर्यसंघातुनी
मुक्त जे गाइले सूक्त तेजस्वि ते
लहरताना दिसे या स्वरांच्या वरी ।। १ ।।

दुष्टनिर्दालना सुष्टसंरक्षणा
धर्मसंस्थापना चेतवी जी मना
कल्पवृक्षापरी छत्र माथी धरी ।। २ ।।

स्तंभिकेतळी हिच्या अखंड यज्ञ मांडिले
घेतली महाव्रते सहस्र प्राण सांडिले
ही असो महत्पदी वैभवाच्या शिरी ।। ३ ।।

क्षुब्ध लाट होउनी कधी नभी थरारते
हर्षमत्त होउनी कधी रणात नाचते
उधळिते घेउनी अग्निपुष्पे करी ।। ४ ।।

जिंकुनी दिशा दहा वाहु त्या हिच्या पदी
तेजप्राप्त हो असे कुणी न पाहिले कधी
हाच प्राण हेतु अन् ध्यास हाच अंतरी ।। ५ ।।