हिंदुभूमीच्या गौरवात मज श्रेय गवसले हो
समर्पणाचे शुभ्रकमल हृदयात विकसले हो ।। ध्रु. ।।
अहंपणाचे तुटता अडसर आत्मशक्तिचे विमुक्त निर्झर
दो तीरांना फुलवित फळवित हसत निघाले हो ।। १ ।।
स्फटिकगृहीच्या दीपापरि मन प्रसन्नतेने ये ओसंडून
चिरंतनाच्या चिंतनात मग सहजचि रमले हो ।। २ ।।
ध्रुवापरि दृढ ध्येयप्रवणता ऋजु समर्थता कार्यशरणता
बहुत शोधुनि हे जीवनस्वर आज उमगले हो ।। ३ ।।
हवे कुणा घर? माझे त्रिभुवन, आप्तचि सगळे सुहृद प्रियजन
कोटिकरांनी जगदंबेने कुशित घेतले हो ।। ४ ।।