उमेदीत आरंभ हो जीवनाचा, कुलीनाघरी जन्म झाला ततः किम् ?
मिळे गोमटे रूप, बुद्धी कुशाग्र, सुविख्यात शाळेत आला ततः किम् ?
शिकूनि कला, शास्त्र, विद्या समग्र, परीक्षेत उच्चांक केला ततः किम्?’
मिळे वैद्यकी, यांत्रिकीला प्रवेश, व्यवस्थापनी, शासनी वा ततः किम् ?
क्षणाचीच आरास जाईल वाया जरी जीवनी राष्ट्रसेवा घडे ना ।। १ ।।
कबड्डीत, खोखोत निष्णात झाला, नि फुटबॉल, टेनीस जिंके ततः किम् ?
सतारीत, गाण्यात, नाट्यात रंगे मिळाल्याच सर्वत्र टाळ्या ततः किम् ?
पडू लागली छाप संभाषणी अन् सभा जिंकिल्या भाषणांनी ततः किम् ?
कथा, लेख, काव्ये प्रसिद्धीस आली, बहू छापुनी ग्रंथ झाले ततः किम् ?
क्षणाचीच आरास जाईल वाया जरी जीवनी राष्ट्रसेवा घडे ना ।। २ ।।
विदेशी प्रवासास जाणे घडे वा तिथे राहणे नित्य झाले ततः किम् ?
सुखे देखिली, ऐकिली, चाखिली अन् किती हूंगिली, स्पर्शिली ती ततः किम् ?
बडी नोकरी वा निजी कारखाना पगारात, सत्तेत वृद्धी ततः किम् ?
पदे भूषवीली पुढारीपणाची मिळाली समाजी प्रतिष्ठा ततः किम् ?
क्षणाचीच आरास जाईल वाया जरी जीवनी राष्ट्रसेवा घडे ना ।। ३ ।।
गुणी, गौर, सच्छील लक्ष्मीच जैसी अशी बायको लाभलेली ततः किम् ?
गुणी, देखणा आणि कर्तृत्वशाली पती लाभला राजबिंडा ततः किम् ?
फुलासारख्या हासऱ्या, गोजिऱ्या त्या मुलांनी घरा शोभविले ततः किम् ?
घरी फ्रीज, टि.व्ही.नि सोयी सुखाच्या गडी, फोन, दारात गाडी ततः किम् ?
क्षणाचीच आरास जाईल वाया जरी जीवनी राष्ट्रसेवा घडे ना ।। ४ ।।
अशा शर्यती चालल्या आंधळ्यांच्या तयामागुनी धावणे हे ततः किम् ?
कुठे जात आम्ही ? पुढे काय आहे? असा प्रश्न का हो पडे ना तुम्हाला?
जरी लोक येथील कोट्यानुकोटी कसे दैन्य देशात कोणी बघेना ?
करूमातृभूमी जगी श्रेष्ठ ऐशी चला पौरुषाची प्रतिज्ञा करू या
असे दिव्य आव्हान हे विक्रमाचे जिणे राष्ट्रकार्यार्थ हो कांचनाचे ।। ५ ।।