लेख क्र. ५५
२६/०८/२०२५

गणपती अखिल सृष्टीचे आराध्य दैवत आहे. नेहमीच त्याची पूजा-अर्चना केली जाते. परंतु भाद्रपदातील गणेश चतुर्थी वेगळेच चैतन्य घेऊन येते. सगळ्यांमध्ये उत्साह संचारतो, घराघरांत सजावट केली जाते, मिष्टान्न केले जाते. असा हा उत्साहवर्धक सण उद्या सुरू आहे. या उत्साहाबरोबरच गणपतीचे स्वरूपही आपल्याला माहित हवे. वेदकाळापासून अगदी आत्ताच्या काळापर्यंत अनेक ग्रंथांत, साहित्यात गणपतीचे वेगवेगळ्या प्रकारे वर्णन केलेले दिसते. त्याबद्दल डॉ. सुजाता बापट यांनी लिहिलेले लेख येथे देत आहोत. यासोबत गणेश प्रतिष्ठापना करण्याआधी आपल्याला काही प्रश्न पडतात, एखादे साहित्य नसेल तर काय करायचे, मूर्तीचे मुख कोणत्या दिशेला असावे, मुहूर्त चुकला तर चालतो का? इ. या प्रश्नाची उत्तरे आपण चित्रफितीच्या माध्यमाने पाहूया. लेखाच्या शेवटी चित्रफित जोडली आहे.
सुखकर्ता, दुःखहर्ता श्रीगणेश हे केवळ भारतीयांचेच नाही तर जगतातील अनेक पुरातन मानव समूहांचे आराध्य दैवत आहे. तो मंगलमूर्ती आहे आणि मोदकप्रिय सुद्धा आहे. अर्थात जे जे मंगल आहे, उदात्त आणि उन्नत आहे यांचे तो रुप आहे आणि जे आनंददायी आहे ते त्याला प्रिय आहे. अशा ह्या गणरायाचे लवकरच आगमन होणार आहे. पूर्वीच्या काळी केवळ घरांमध्ये ज्या गणरायाची प्राणप्रतिष्ठा केली जायची, गणेशोत्सव साजरा केला जायचा, त्या गणरायाची प्राणप्रतिष्ठा सार्वजनिक स्वरुपात करण्यास लोकमान्य टिळकांनी सुरुवात केली. हा उत्सव सार्वजनिक करण्यामागे लोकमान्यांची त्या काळी जी भूमिका होती, तीच आजही थोड्याफार फरकाने कालसुसंगत आणि उपयुक्त आहे.
अशा ह्या गणरायाच्या रुपाविषयी, त्याच्या जन्माविषयी अनेक आख्यायिका प्रसिद्ध आहेत हे आपण जाणतोच. वेदांमध्ये हा गणेश ब्रह्मणस्पती ह्या स्वरुपात आपल्याला भेटतो. ऋग्वेदातील दुसऱ्या मंडलातील तेविसाव्या सूक्ताचे नावच ब्रह्मणस्पति सूक्त असे आहे. यात गणेशाचे सगळे रुप उलगडून दाखवले आहे. श्रीगणेशउत्तरातापिनी उपनिषद हे अत्यंत सुंदर उपनिषद आहे, या उपनिषदामध्ये हा गणेश आपल्याला ओंकार स्वरुपात दिसून येतो. ओंकाराचे सर्वव्यापित्व, गणेशाचे ओंकार रुपत्व, गणपतीचे शक्तिरुप, गणेशप्रणवापासून सृष्टीची उत्पत्ती, गणेशमंंत्राचे महत्त्व आणि नंतर त्यांचे आचरण कसे करावे याविषयीचे सविस्तर वर्णन केले आहे. गणपती उपनिषद किंवा ज्याला आपण सारे गणपती अथर्वशीर्ष म्हणून ओळखतो, त्यात गणेशाच्या उपासनेसंबंधीचे आणि त्याच्या ईशत्वासंबंधीचे वर्णन वाचायला मिळते. गणेश म्हणजे कोण? तर गणानां जीवजातांना यः ईशः स गणेशः। सर्व गणांचा, गुणांचा, त्रिगुणात्मक प्रकृतींचा, या पृथ्वीतलावर आणि संपूर्ण विश्वामध्ये जेवढे प्राणीमात्र, भूतमात्र आणि जीवजंतू आहेत, त्या सर्वांचा स्वामी, ईश तो हा गणेश होय. गणेशं, प्रमथाधीशं, निर्गुणं, सगुणं विभूम् । तो कसा आहे? तर तो निर्गुण आहे आणि सगुण देखील आहे.
स्मृतिग्रंथांमध्ये देखील त्याचे वर्णन आले आहे. बृहत् पराशरस्मृती या स्मृतिग्रंथात पराशरांनी त्यास “गणेश्वर” असे म्हटले आहे. याज्ञवल्क्य स्मृतीतही ह्या विनायकाची शालकंटक, कुष्मांड राजपुत्र, स्वस्तिम् आणि देवयजन ह्या रुपांमध्ये वर्णने आली आहेत. रामायणात वाल्मीकींनी गणेशस्तवन केले आहे आणि ओंकारस्वरुप गणेशाचा उल्लेख केला आहे. महाभारताचा लेखनिक म्हणून श्रीगणेश आपल्याला सुपरिचित आहेच. अनेक पुराणांमध्ये गणेशमहिमा आलेला आहे. त्यातील गणेशपुराण आणि मुद्गलपुराण ही दोन पुराणे विशेष करुन गणेशगौरव आणि त्याचे व्यापक स्वरुप स्पष्ट करणारी आहेत. संस्कृत, प्राकृत वाङ्मयात देखील गणेशाचा उल्लेख आपल्याला आढळतो. संस्कृत नाटककार भवभूती यांनी मालती-माधव ह्या नाटकामध्ये पहिल्या नांदीत गजमुख गणपतीला वंदन केले आहे. सातवाहनाच्या गाथा सप्तपथी गणपतीला “गणाहीवही” असे म्हणून साद घातली आहे, त्याला वंदन केले आहे.
सकल संतांनी देखील ह्या गणरायाला साद घातलेली आहे. ज्ञानेश्वर म्हणतात, हे शब्दब्रह्म अशेष। तेचि मूर्ति सुवेष। जो निर्गुण आहे, तोच माझ्यापुढे सगुण होऊन प्रगटला. देवा तुचि गणेशु। सकलमति प्रकाशु। सर्वांच्या बुद्धीचा प्रकाश तूच आहेस, असे माऊली म्हणतात. असे सर्वच संतांनी चौदा विद्या चौसष्ट कलांचा अधिपती गणेश याचे वर्णन सुरम्य पद्धतीने केले आहे. “सुखकर्ता दुःखहर्ता” ही समर्थ रामदासांनी रचलेली गणेशाची आरती लोकप्रिय आहेच. असा हा गणेश अबालवृद्धांचा लाडका देव आहे. त्याच्या आगमनाची, स्वागताची आपण सर्वजण तयारी करतो आहोत. ही तयारी करत असताना आपण सगळे एकत्रितपणे काम करतो, त्यातून आपली संघटनेची भावना मनात पक्की होत जाते. ह्यालाच आणखी शुभ संकल्पांची जोड देण्याची आज गरज आहे. गणेश हा गणांचा म्हणजे समूहाचा अधिपती आहे. त्याची अर्चना, प्रार्थना पण आपण संघभावनेनेच करायला हवी. शुद्ध सात्विक भावाला, शिस्तीची, पावित्र्याची आणि मांगल्याची जोड द्यायला हवी. अभिरुचीसंपन्न आणि उत्तमोत्तम सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल ह्या उत्सवाच्या निमित्ताने कशी राहील आणि ती वृद्धिंगत कशी होत राहील याचा विचार आपण नक्की करुया. निस्सीम भक्ती, सेवा, आणि समर्पण, मंगलकारक आचार, विचार आणि उच्चार ही त्रिपुटी आपण कायम जपूया. आपण करावे, करवावे, असा कामाचा आदर्श इतरांसमोर आपण ठेवूया. अथर्वशीर्षामधील गणेशाचे सगुण-निर्गुण रुप, त्याचे माहात्म्य, गणेशमंत्र, त्याचा ध्यानश्लोक, शेवटी येणारे गणेशनामाष्टक हे सारे सार्थपणे समजून, उमजून ह्या लाडक्या गणरायाची आपण प्राणप्रतिष्ठा करुया. उदंड विद्या मिळवून आपल्या हातून सत्कार्य घडावे, सकलगुणनिधान गणरायाच्या गुणांचे ग्रहण, धारण आपल्यालाही करता यावे, अशी प्रार्थना आपण ह्या निमित्ताने गणरायाच्या चरणी करुया.
॥गणपती बाप्पा मोरया॥