सइबाई ग राहिबाई ग आज आक्रीत ऽ घडलं
शिवगंगेच्या राहाळाचं गिऱ्हाऽण सुटलं ।। ध्रु. ।।
कोण कुठला कंजारभाट त्यानं लाविला बाई नाट
माझं शिवार हिरवा शालू त्याचा फाडीला जरीचा काठ
घरोघरच्या माऊलीचं बाई नशीब फुटलं ।। १ ।।
माझं माणूस माथेफिरू त्यानं आणली सवत दारू
सुटं चौखूर हा वारू त्याला कसा ग आवरू
सखि बहिणाबाई माझ्या आज औषध भेटलं ।। २ ।।
दारोदार झाली दारू वहावले बापलेक
भांडतंडती भावकी कोण करी देखरेख
बाई पोरांच्या ग रूपानं आज तुफान उठलं ।। ३ ।।
नोटंसाठी नादावलं नेहरू गांधींचं सरकार
माझ्या पोराबाळांसाठी त्यानं वाटीला विखार
झाल्या कष्टकरी जाग्या हाती निशाण धरलं ।। ४ ।।