एकीचा हिसका दाउ द्या कि रं…..

सोसायचं कुठवर या गरिबानं आता
सुखाचं चार घास खाउ द्या की
एकीचा हिसका दाउ द्या कि रं
दारूला दणका देउ द्या की ।। ध्रु. ।।

बाप आन् चुलता गुतलाय पुरता,
मामा न् मेव्हना उलथापालथा
सरपंच चेअरमन शाणासुरता,
भावकी न् गावकीचा टेकलाय माथा
मुळावर लाथा देउ द्या कि रं ।। १ ।।

नशिबाशि टकरा, बळीचा बकरा,
दुबळ्याच्या घराला खिंडारं सतरा
दळतोय आंधळा पीठ खातो कुतरा,
आवंदाचं जाउ द्या, म्होरच्याला सुधरा
आताच गनीम आवरा कि रं ।। २ ।।

कायद्याचं कुपान खातंया शेत,
पुढारी लाचार, माजल्याती भुतं
दिवसा हितं न् रातच्याला तिथं
कितीबी भरा ते रांजाण रितं
आताच्या आता हे जाउ द्या कि रं ।। ३ ।।

काहीबी सडतंय् पोटात पडतंय्,
डोक्यात चढताच इपरित घडतंय्
दारूच्या घोटात समदाच तोटा;
लबाड कंजारी लाटतोय् नोटा
त्यालाच सोटा देउ द्या कि रं ।। ४ ।।

कर्त मानुस नशेमधि कुजलं,
सुखाचं सपान जागीच इझलं
आईच्या आसवांनी घरदार भिजलं,
उद्याचं सुख यानं आजच इकलं
गाव सारं येडं तिथं ह्याचं काय चुकलं,
संगतीच्या सरणानं हातपाय भाजलं
आता पोरं तरी शाहाणी होउ द्या कि रं ।। ५ ।।

सरकारचं माथं जाग्यावर नाही,
देशी दारूची लायसनं देई
उद्याच्या पिढीला चावून खाई;
सडल्याती शहरं इलाज नाही
पन आम्हांला आमचं पाहु द्या कि रं ।। ६ ।।

एकीचा हिसका दाउ द्या कि रं,
दारूची दुकानं जाउ द्या की
एकीचा हिसका दाउ द्या कि रं,
दारूचं दुखणं जाउ द्या की
दारूला दणका देउ द्या की !