गाव माझा मी गावाचा

गांव माझा माझा माझा माझा ऽ मी गांवाचा ।। ध्रु. ।।

गांव पाहावयासी गेलो ऽ गांवकरी होऊनि ठेलो ऽ
गांव राहावे निर्मळ ऽ अशी धरीन मी तळमळ ।।१।।

गांवासंगे फुलली शाळा ऽ व्यसनांना ती घालील आळा ऽ
गांवातील शेती भाती ऽ राहावी तिच्याशी दृढ नाती ।।२।।

गांवातील हो ग्रामस्था ऽ असावी एकमेंका आस्था ऽ
एकी असेल आमुचे मूळ ऽ वादविवाद घालवू समूळ ।।३।।

गावाचा चालवण्या गाडा ऽ नको राजकीय राडा ऽ
गांव आणि गांवकरी ऽ नको तेथे सावकारी ।।४।।

नाते असू द्या हो जीवाचे ऽ ओस पडू नये घरटे साचे ऽ
शिकूया आणि गांवात टिकूया ऽ शहरांत जाऊन नकोच वाकू या ।।५।।

खेड्यामध्ये भारत खरा ऽ सार्थ आपण करू हा नारा ऽ
प्रबोधिनीचा गाऊनी अभंग ऽ गांवी होऊया हो दंग ।।६।।