माझ्या बाई म्हायेराला, मायंदाळ मायाळू लोकं
गाव सुधारलं अन् समद्यांचं जाग्यावर डोकं ।। ध्रु. ।।
बायामान्सांना कामाचा भार, हिंडतोय बाप्या दारोदार
पोरांचा भारा न लेंढार फार, खान्या पिन्याची मारामार
हे नाय माहेरी घरी न् बाहेरी, समद्याचं वागनं चोख ।। १ ।।
निर्माळ गोठा निर्माल चूल, हसतंय खेळतंय निर्मळ मूल
गोठ्यात गाईन् दूधाचा पूर, बाई न् बाटली ठिवलीया दूर
म्हायेर असलं, सासर तसलं, लय बाई न्यारा झोक ।। २॥
तालीम देऊळ लेझीम ढोल, शिवार हिरवं तालात डोलं
भांडान तंटा चहाडी न्हाई, भुतं खेतं करणी न् कुभांड न्हाई
सावकार सरला मारवाडी म्येला, समदाच व्यवहार रोख ।। ३ ।।
बायाबाप्यांना कामाची घाई, म्हाताऱ्या गड्यांची भजनाची घाई
रिकामा मानूस पारावर न्हाई, मुलगी न् मुलगा साळंला जाई
सुनंला छळणं, कोर्टात पळणं, समदंच टळल्यात धोकं ।। ४ ।।
म्हायेर मोठं न् सासर खोटं, निस्तंच रडण्यात मायंदाळ तोटं
सासर सावरू भांडान आवरू, बाप्यांच्या जोडीनं घरदार सुधरू
गरीबी टाळू, दागिनं माळू, सोन्याला देऊन ठोक ।। ५ ।।