शीव ही ओलांडून जाणार !

ही गगनविहारी रानफुले, ही गावकुसातिल शूर मुले
हे रानवनाच्या मातीमधले उत्सुक नव हुंकार
ओलांडुन जाणार, शीव ही ओलांडुन जाणार ! ।। ध्रु. ।।

शतशतकांच्या चाकोऱ्यांनी, घट्ट बांधली नशिबे ज्यांची
आज पाहुनी दुनिया, त्यांना स्वप्ने पडती भव्य उद्याची
पिढ्यापिढ्यांची दरिद्रताही जखडु न त्या शकणार
ओलांडुन जाणार, शीव ही ओलांडुन जाणार ! ।। १ ।

पाठीशी नच कोणी ज्यांच्या, कळति न वार्ता मुळी जगाच्या
स्पर्धेचे निर्दय जग तुडवी, तरी उमेदी अभंग ज्यांच्या
फुरफुरणाऱ्या भुजा जगाला आव्हाने देणार
ओलांडुन जाणार, शीव ही ओलांडुन जाणार ! ।। २ ।।

नवे शिकाया नाही अडसर, भय नाही ना काही दुस्तर
लाज असूया आळस मत्सर, दुबळेपण सोडून दूरवर
सामर्थ्याची चुणूक आम्ही दाखवून देणार
ओलांडुन जाणार, शीव ही ओलांडुन जाणार ! ।। ३ ।।