आम्ही उसळत्या लाटा

आम्ही उसळत्या लाटा चैतन्य सागरीच्या॥ध्रु.॥

आम्ही सोत्कंठ भूमिच्या अंकुरल्या आकांक्षा
आम्ही पोलादी पंखांनी झेपावतो दशदिशा
आम्ही अमृतकलश अर्पितो पदी आईच्या॥१॥

आहे ज्वालांशी फुलांशी प्रखर कोमल नाते
आहे तेजस्वी संयत अमुच्या खड्गाचे पाते
दिसो दुरित कोठेही कोसळू मस्तकी त्याच्या॥२॥

आम्ही प्रसन्न पुष्पाच्या उमलत्या पाकळ्या
आम्ही आदित्य तेजाच्या धाकुल्या किरणकळ्या
देवभूमिच्या पूजेत उजळू ज्योती प्राणांच्या॥३॥