भारतमाता एकच दैवत

भारतामाता एकच दैवत येत्या दिवसांचे
इतर देव हे नाममात्र अन्‌‍ केवळ नवसांचे
असे हे शब्द नरेंद्राचे॥ध्रु.॥

युगयुग अपुल्या भरणपोषणा
असुरांपासुन नित्य रक्षणा
या मातेचे आशीर्वादच अपुल्या हक्काचे॥१॥

खरे, स्वयंभू, जागृत, पावन
दैवत हे तर अपुले आपण
नाहि दुरावा, द्वैत न उरले देवाभक्तांचे॥२॥

या देशातील हे नारीनर
सन्मानाने जगावेत जर
आपसातले विसरू भांडण अनंत शतकांचे॥३॥

कसले उत्सव, कसल्या यात्रा
दैन्य जोवरी, अन्न न पात्रा
वेदान्ताशी जोडू विक्रम, ध्येय भारताचे॥४॥

स्मरुनी केवळ ते गतवैभव
लोपत नाही दरिद्र वास्तव
यत्न हवे आनंद लाभण्या, बोल विवेकाचे॥५॥