वंदन वंदन त्रिवार वंदन

हिंदुजातिची विजयपताका तुम्ही आणिली गंगोत्रीहुन
वेदवती या यात्रेमधले पथिक तुम्हाला करतो वंदन
वंदन! वंदन! त्रिवार वंदन!!॥ध्रु.॥

आक्रमकांनी धर्म बुडविला, होऊन दीप्ति मार्ग दाविला
देव मस्तकी धारण करिता, कर्तृत्वाचा वन्हि फुलला
महाराष्ट्र धर्माचा दिधला शिवरायांना मंत्र नवा
तुमच्या स्फूततून उमलले, आनंदाचे मंगल भुवन॥१॥

निराश निद्रित विमनस्क मनी, विझल्या ज्योति पुन्हा पेटवुनि
स्वधर्म सांगुन, प्रकाश दावुन, भय नाशियले तांडव बनुनि
सरस्वतीचे तुम्ही उपासक, दयानंद हे तुमचे नाव
तुमच्या स्मरणे अमुच्या हृदयी, हिंदुत्वाचे स्फुरले गायन॥२॥

भारतभूचा प्राण जाणुनि, भवितव्याचे दर्शन घडवुनि
अद्वैताचे अमृत अर्पुनि, ध्वज धर्माचा गगनी भिडवुनी
नरदेहाचे केले सार्थक, नरेन्द्र ! तुमचे आम्ही उपासक
कार्य अधुरे अनुसरताना, सुगंधित हो अमुचे जीवन॥३ll

दिव्य जीवनी तुमच्या दिसला तेजाचा त्या नव अवतार
घोष जगी या अखंड चालो, तव नामाचा हो अरविंद
चित्‌‍शक्तीच्या अवतरणाला, घडो आमुचे जीवन साधन॥४॥

प्रबोधनाचे तुम्ही प्रवर्तक, हिंदुत्वाचे अहो उपासक
नवधर्माचे तुम्ही प्रचोदक, मानव्याचे जणु पथदर्शक
मार्ग आमुचा उजळो जगति, तेजोमय हे तुमचे जीवन
आता तुम्हा स्मरताना घडले, कर्तव्याचे समग्र दर्शन॥५॥