रुळल्या वाटेवरती चाले भेदरलेला मठ्ठ गडी
पंख पसरुनी विहरे त्याला जाई तेथे पायघडी ॥ध्रु.॥
गृहीत असता जुने, पद्धती फार पुराणी ठरलेली
कितीही धावा चाकोऱ्यांनी चाके जखडुनि धरलेली ॥१॥
एक कल्पनालोलक हलता शब्दांना रोमांच फुले
भावसागरा भरती येता लीलासलिला लाख फुले ॥२॥
शब्दाश्मांच्या पलिकडचेही दिसती अंकुर रोज नवे
तिमिरातूनहि लख्ख दाखवी प्रतिभाचक्षू भावदिवे ॥३॥
प्रतिसृष्टी आकळते ज्याला प्रतिभास्कर तो भावकवी
लोकविलक्षण ज्याची दृष्टी त्याला सृष्टी रोज नवी ॥४॥
शब्दांची लय ल्यावी वलये अर्थकणांची उमटावी
पाताळाच्या तळास अलगद हिमशिखरेही जोडावी ॥५॥
कल्पक योजक सर्जक होता प्रश्नांमागे येई उत्तर
संवेदनशीलास भावते अकल्पिताचे अवघे अंतर ॥६॥
प्रत्येकाचे दैवी देणे खोदून लेणे मुक्त करी
अक्षरअक्षर मैत्रवैखरी योजक होता तूच हरी ॥७॥
प्रतिभाप्रांतांचा तू अतिथी सगळी दारे तुज उघडी
पंख पसरुनी विहरे त्याला जाई तेथे पायघडी ॥८॥