देवाची जरि ही करणी, विज्ञाने सजवू धरणी
दीनअनाथांच्या आधारा यंत्र उभे ठाकेल जनी॥ध्रु.॥
कितीही ढकला वरती तरिही धोंडा खाली गडगडतो
वाफ होउनी जाते पाणी ढग त्याचा कैसा बनतो?
इथला ढग तिकडे का जातो? वारा का जागा सोडी?
उंचावरती थंड हवा का? बर्फ का बने गिरिशिखरी?
पडत्या पाण्यावरती बनते वीज कशी सांगा मजला
याच विजेवर नव्या जगाचा डोलारा सारा सजला ॥१॥
एक धु्रवावर बोले माणूस दुसरा ध्रुव ऐके कैसा?
इथे चालता खेळ, पाहतो जगभरचा माणूस कसा?
जिते जागते चित्र काढुनी पुन:पुन्हा बघतात कसे?
जग झाले मयसभा इथे तर ठोंब्यांचे होणार हसे
कुणाकुणाचे चलाख डोके थिटे पडे संगणकाशी
या जादूच्या दिव्यात राक्षस हजर सदा आम्हापाशी ॥२॥
जरि ईश्वरे रचला मानव परि तो रचतो नवदुनिया
मानवदेहाच्या कोड्याचा पुरा उलगडा होत तया
असे का, तसे का न असावे? कशामधुन हे काय घडे?
आज असे मग उद्या का तसे प्रश्न असा ज्या रोज पडे
ऐसे करता घडते ऐसे तैसे करता काय घडे?
प्रयोग करती जे शंकासुर तेच उद्याचे वीर बडे ॥३॥