घरात बेकी, दारात बेकी, बेकीचा पाढा आता घोकायचा नाय
एकीचं गुपित जाणून जगात, एक दिलानं नांदायचं हाय ! ॥धृ॥
कथा न् कीर्तन, पुराणातली वांगी
समद्यात एकीची जपलीया सांगी
आपल्याच डोक्यात बेकीच्या खुळानं
भुतागत नाच ह्यो मांडलाय काय?
बेकीच्या नादानं, भांडान-तंट्यानं
कुणाचं भलं कधी झालंय काय? ॥१॥
निर्मळ मनाची निर्मळ वाणी
समद्यांच्या भल्याची कळकळ मनी
आपल्याच कष्टानं, हिकमत, हिमतीनं
आपलंच रूपडं सुदरायचं हाय
काजळी लोटून, बावन्नकसाची
झळाळी चमक उजळायची हाय ! ॥२॥
इथं मराठेशाही गर्जत नांदली
शिवबाच्या बोलावर इमानं झुंजली
नुसत्याच घोषणा वारसदारीच्या
पोकळ गमजा आता चालायच्या न्हाय
दुफळीच्या ठिणगीनं दौलत सारी
क्षणात वणव्यात उधळायची काय? ॥३॥
यंत्रयुगाचा आलाय जमाना
ट्रॉली न् ट्रॅक्टर चाले दणाणा
टी. व्ही. न् कम्प्युटर, मोबाईलची भाषा
कशाला घाबरायचं कामच काय?
रामाच्या सेनेची शपथ आम्हाला
हनुमान उडी आता मारायची हाय ! ॥४॥