उठ भारता

ऊठ भारता, आठव फिरुनी तेजस्वी इतिहास
गतवैभव ते मिळवायाचा, लागो तुजला ध्यास॥ध्रु.॥

तुला न भीती कळिकालाची
जागव श्रद्धा नचिकेत्याची
अशक्य तुज ना काही, असता आत्म्यावर विश्वास॥१॥

करी गर्जना निर्भयतेने
अंतरिच्या त्या सामर्थ्याने
मोहतमातुन प्रकाशाकडे होवो नित्य प्रवास॥२॥

त्यागातच सार्थक जन्माचे
करी स्मरण या आदर्शाचे
तुजसाठी ना जगतामधले कुठले भोगविलास॥३॥

विक्रम आणिक वैराग्याचा
संगम तुझिया ठायी साचा
त्याच संगमी पुण्य स्नान हे घडो सर्व जगतास॥४॥

हाक घालुनि मानवतेला
जागव तिचिया चैतन्याला
विजयध्वज तो अध्यात्माचा नेई सर्व दिशांस॥५॥