युगांतराचे अग्रदूत व्हा रे

विवेकवाटेवरि आनंदे ध्येय गाठणारे
नवयुवकांनो युगांतराचे अग्रदूत व्हा रे!॥ध्रु॥

जरी पुरातन आणि वैभवी भारत हा होता
लयास गेली साम्राज्ये ती परक्यांनी लुटता!
दीन दरिद्री अज्ञानी जन दु:खांनी पिचले
त्यांच्यासाठी कळवळणारे कुणि न कसे उरले
उरात हळवेपण ज्यांच्या ते बदलणार सारे
नवयुवकांनो युगांतराचे अग्रदूत व्हा रे ! ॥ १॥

केवळ करुणा असून अपुरी मार्ग निघायाला
उपाय सुचणे आणि साधने हवी जुळायाला
इतरांपेक्षा उजवी अस्त्रे शास्त्रे माणुसबळ
दारिद्य्राचा अंत खरे तर या सर्वांचे फळ
सुचतील ज्यांना नवी प्रमेये उघडण्यास दारे,
नवयुवकांनो युगांतराचे अग्रदूत व्हा रे ! ॥२॥

करुणा प्रज्ञा सर्वसाधने असूनिही भारी
अगणित येती नित्य अडथळे, भेटतात वैरी
देश बांधवांच्या दुर्गतिची अखेर साधाया
अदम्य इच्छा, मित्रमंडळ हा एकमेव पाया
कितीही अवघड मार्ग तरी जे अथक चालणारे
नवयुवकांनो युगांतराचे अग्रदूत व्हा रे ! ॥ ३॥