१९८२ साली ज्ञान प्रबोधिनीने ‘समाज ऐक्य समिती’ या नावाने पुणे शहरात आणि महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या जिल्ह्यांच्या ठिकाणी अभियान चालवले होते. १९८३-८४ मध्ये या समाज ऐक्य समितीने, खलिस्तानची मागणी कशी चुकीची आहे, हे लोकांना समजावून सांगण्यासाठी पंजाबमध्येही दोन दौरे आणि पदयात्रा काढल्या, लागोपाठच्या वर्षांमध्ये झालेल्या या दोन अभियानांमुळेच राष्ट्रीय एकात्मता या विषयाचे दोन पैलू लक्षात आले होते. देशातील सीमावर्ती राज्यांमध्ये फुटीरतेचे वातावरण राहू नये व देशाची अखंडता अभेद्य राहावी यासाठी सतत प्रयत्न करावे लागतात. तसेच देशाच्या सर्व भागांमध्ये श्रीमंत गरीब, शहरी-ग्रामीण, उच्चशिक्षित-अल्पशिक्षित, साधन-संपन्न व साधनहीन असे जे गट असतात, त्या गटांमधील आर्थिक, शैक्षणिक व मानसिक दरी कमी होऊन या विविध गटांमधील सामंजस्य, बंधुभाव व परस्पर सहकार्य वाढते असावेत हे देखील राष्ट्रीय एकात्मतेचे काम आहे. देशाची अखंडता टिकवणे व सामाजिक ऐक्य भावना वाढवणे, ही दोन्ही राष्ट्रीय एकात्मतेचीच कामे आहेत.
शहरी आणि ग्रामीण भागातील ही सर्वच कामे शैक्षणिक, आर्थिक आणि सामाजिक स्थिती सुधारून समाजातील उपेक्षित गटही अनेक संधी असलेल्या गटांबरोबर जोडले जावेत व समाजातील ऐक्यभावना वाढावी या हेतूने केले जाते. क्रमिक शिक्षणाला पूरक शैक्षणिक उपक्रमांची जोड, अनुभव शिक्षण, व्यवसाय शिक्षण, आरोग्य, सांस्कृतिक उपक्रम, उद्योजकता विकास असे यासाठीचे प्रत्यक्ष काम विविध प्रकारचे आहे, तरी त्या सर्वांचा हेतू सामाजिक व राष्ट्रीय ऐक्य वाढावे हाच आहे. या उपक्रमांमुळे नागरी वस्त्यांमधील समाज बांधवांविषयी कार्यकर्त्यांची आस्था व्यक्त होते आणि वाढते. आपुलकीचे बंध तयार होतात. वस्त्यांम धील महिला व युवती त्यामुळे शहरातील इतर वस्त्यांमधील कुटुंबांशी संवाद करू लागतात. त्यांच्यासाठी स्वतःच्या लाभापलीकडे जाऊन काम करू लागतात. स्वतःचा विकास चालू असताना इतरांच्या विकासाच्या प्रयत्नात सहभागी होण्यानेच समाजाच्या व्यक्तीव्यक्तींमधील, गटागटांमधील एकपणाची भावना पक्की होत जाते. जाती-पाती, संप्रदाय आणि धार्मिक भेदाभेद यांच्यामुळे समाजात जो विस्कळितपणा येतो, तो जाऊन “सामाजिक एकात्मता” साधावी, ही पहिली पायरी आहे. स्थानिक सामाजिक गटापुरते मर्यादित न राहता आपण सगळे मिळून एका देशाचे, एका राष्ट्राचे घटक आहोत अशी भावना निर्माण होणे व तशी प्राधान्याने अंगवळणी पडणे ही “राष्ट्रीय एकात्मता”, त्यातून साध्य व्हावी हा मूळ हेतू आहे.
हा हेतू साध्य करण्यासाठी अनेक उपक्रम केले जातात. पुण्यातील नागरी वस्त्यांच्या मध्ये युवती, महिला यांची विविध शिबिरे, प्रशिक्षणे घेतली जातात. सोलापूरमधील विडी कामगार महिलांसाठी प्राणायाम वर्ग आणि पिशव्या निर्मितीचा उद्योग चालतो. अंबाजोगाई मधील भटक्या व विमुक्तांच्या वस्त्यांमधून मुलांना विविध संधी देण्याचे काम चालू आहे. शहरात जसे उपेक्षित गट असतात, तसे ग्रामीण भागातही कमी-अधिक संधी असलेले गट असतात, वेल्हे तालुक्यातील कातकरी आणि धनगर वस्त्यांच्या मधील मुलींच्या शिक्षणासाठी सहनिवास चालवला जातो, तसेच गावागावातील एकल महिलांसाठी विविध प्रकल्प चालू असतात. धाराशीव जिल्ह्यातील गावांमध्ये असलेल्या भटक्या विमुक्तांच्या तांड्यांवरही त्यांच्या गोरमाटी भाषेत प्रबोधिनीचे काम चालू असते.
याचप्रमाणे विविध भाषा, दूरदूरच्या अंतरावरील प्रांत यांच्यामुळे देशात जो विस्कळितपणा येतो, तो जाऊन देशाची “प्रादेशिक अखंडता” साधावी, ही पहिली पायरी आहे. त्यासाठी आधी आपण प्रवास आणि निवास करून त्या समाज गटांशी नाते जोडणे आवश्यक असते. अशी नाते जोडणारे, मानसिक सेतू बांधणारे ज्ञानसेतू सारखे उपक्रम हे करत असतात. आपापल्या राज्यापुरते मर्यादित न राहता आपण सगळे मिळून एका देशाचे, एका राष्ट्राचे घटक आहोत अशी भावना दूरदूरच्या समाज गटात निर्माण करावे ही पुढची पायरी आहे. यासाठी छत्तीसगडमध्ये बस्तरसारख्या नक्षल ग्रस्त भागात, अशांत मणिपूरमध्ये इंफाळ, तमेंगलोंग, चुराचांदपूर येथे, अरुणाचल प्रदेशात रोईंग, तेड्नु, तवांग येथे, जम्मू-काश्मिर मध्ये पूंछ कुपवाडा अशा दहशतवादाने त्रस्त पट्ट्यात, याशिवाय झारखंड, लडाख, मेघालय, आसाम अशा सीमावर्ती आणि संवेदनशील राज्यांमध्ये ज्ञान प्रबोधिनीचे अनेक शैक्षणिक उपक्रम चालू असतात. क्रमिक शिक्षणाला पूरक शैक्षणिक उपक्रमांची जोड देताना या संवेदनशील राज्यांमध्ये नाते संबंध घडविण्याचे काम करावे लागते. अंतरामुळे आलेला दुरावा मानसिक दुराव्यात रूपांतरित होऊ नये याची काळजी घ्यावी लागते. प्रादेशिक अखंडतेची जाणीव वाढावी यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करावे लागतात. भारतीय संस्कृती त्या त्या राज्यात फुलताना तिने काय विशेष रूप घेतले याचा शोध घ्यावा लागतो आणि त्या रूपाचे आपल्याशी नाते कुठे आहे हा मुळाचा शोधसुद्धा घ्यावा लागतो. राष्ट्रीय एकात्मतेचे खरे काम हे देशातील सर्वांनीच आपल्या वैशिष्ट्यांचा आणि इतरांच्या स्वतंत्र वैशिष्ट्यांचा आनंद घेताना त्यात मुळात असणाऱ्या एकपणाच्या जाणिवेचा शोध घेणे हेच आहे.
आशुतोष बारमुख – सहकार्यवाह, ज्ञान प्रबोधिनी