वर्षारंभ उपासना – प्रौढ सदस्यांसाठी

प्रस्तावना

भारतीय परंपरा आणि भारतीय संस्कृती यानुसार शिक्षण द्यायचे असेल तर ऋषी-मुनी आणि संत यांच्या तत्त्वज्ञानाची आणि जीवनाची आठवण सतत राहिली पाहिजे. या दृष्टीने १९६५ साली ज्ञान प्रबोधिनीमध्ये वर्षारंभ दिनाच्या उपासनेची सुरुवात करण्यात आली. या उपासनेमध्ये आधी सरस्वती-स्तवन होते. मग ईशावास्योपनिषद आणि कठोपनिषदातील काही श्लोक होते. त्यानंतर गुरुवंदना आणि गुरुशिष्यसंबंधांविषयी श्लोक होते. त्यानंतर व्यसनांपासून दूर राहण्यासंबंधी आणि ध्येयनिष्ठेविषयी सूचना करणारे श्लोक होते. मग प्रत्यक्ष ध्येयाचा उच्चार व त्यासाठी नियमांचे पालन याविषयीचे श्लोक व अभंग होते. शेवटी हा सर्व आशय मराठीतील गद्य प्रार्थनेमध्ये मांडला होता. या वर्षारंभदिन उपासनेचा शेवट गायत्री मंत्राने व्हायचा.

वर्षारंभ उपासनेची ही पोथी तयार केली तेव्हा मुख्यतः पुणे शहरातील इयत्ता ८वी ते ११वी चे विद्यार्थी ज्ञान प्रबोधिनीत शिकत होते. त्यानंतर गेल्या ५० वर्षांत ज्ञान प्रबोधिनीचा विस्तार महाराष्ट्रात अनेक ठिकाणी झाला आहे. विद्यार्थ्यांचा वयोगटही वेगवेगळ्या ठिकाणी वय वर्षे साडेतीनपासून वयाच्या एकवीस-बावीस वर्षापर्यंत विस्तारला आहे. शालेय वयोगटाच्या शिक्षणाबरोबरच संशोधन, ग्रामविकसन, प्रशिक्षण, आरोग्य, संघटन, समाजप्रबोधन अशा विविध क्षेत्रांमध्ये काम करणारे अनेक प्रौढ स्त्री-पुरुष सदस्यही ज्ञान प्रबोधिनीमध्ये मनुष्यघडणीचे आयुष्यभर चालणारे सहज शिक्षण घेत आहेत.

या सर्वांच्याच शिक्षणाचा पाया भारतीय अध्यात्मात असला पाहिजे अशी ज्ञान प्रबोधिनीची भूमिका आहे. १९६५ साली तयार केलेली पोथी श्रावणी या प्राचीन संस्काराचे पुनर्रचित रूप होते. ज्यांचे उपनयन झाले आहे, त्यांना आयुष्यभर विद्याध्ययन करण्याच्या व्रताचे दरवर्षी स्मरण व्हावे म्हणून श्रावणी या संस्काराची योजना होती. ज्ञान प्रबोधिनीमध्ये राष्ट्रघडणीच्या ध्येयाचे वार्षिक स्मरण आणि त्या ध्येयाच्या दिशेने पुढील वर्षात काही पाउले पुढे जाण्याचा प्रकट व मनोमन आणि वैयक्तिक व सामूहिक संकल्प करण्याचा दिवस म्हणून वर्षारंभ उपासनेची योजना केलेली असते.

विविध वयोगट आणि विविध प्रकारची कामे करणारे प्रौढ सदस्य यांच्या गरजा लक्षात घेऊन वर्षारंभ उपासनेच्या या तिसऱ्या आवृत्तीमध्ये मोठ्या प्रमाणावर बदल केले आहेत. ज्ञान प्रबोधिनीमध्ये उपनयन संस्काराची पुनर्रचित पोथी विद्याव्रत संस्कार या नावाने तयार केलेली आहे. हा विद्याव्रत संस्कार साधारणपणे इ. ८वी तील सर्व जाती-धर्माच्या मुला-मुलींसाठी करता येतो. पुनर्रचित वर्षारंभ उपासनेमध्ये विद्याव्रत संस्कार झालेल्या आणि शालेय, महाविद्यालयीन, व विद्यापीठातील शिक्षण चालू असलेल्या विद्यार्थ्यांसाठी वर्षारंभ उपासनेची एक संहिता (पोथी) केली आहे. शाळा, महाविद्यालयांमधले शिक्षण संपलेल्या व विविध क्षेत्रांमध्ये काम करणाऱ्या प्रौढ सदस्यांसाठी वर्षारंभ उपासनेची स्वतंत्र संहिता (पोथी) केलेली आहे. या दोन्ही उपासनांची सांगता गायत्री मंत्राने होते.

विद्याव्रत संस्कार न झालेल्या इ. ५वी ते ७ वी च्या विद्यार्थ्यांसाठी वर्षारंभउपासनेची तिसरी स्वतंत्र संहिता (पोथी) केली आहे. या उपासनेचा शेवट गायत्री मंत्राच्या ऐवजी “चिदानंदरूपः शिवोऽहं शिवोऽहम्” या शिवमंत्राच्या उच्चारणाने होतो.

पन्नास वर्षांपूर्वी तयार केलेल्या वर्षारंभ उपासनेच्या पोथीमध्ये प्रत्येक संस्कृत मंत्र दोन वेळा म्हटला जायचा. वर्षारंभ उपासनेच्या तीनही संहितांमध्ये सर्व मंत्र, श्लोक, ओव्या किंवा अभंग एक-एकदाच घेतलेले आहेत. जुन्या संहितेपेक्षा नवीन संहितांमध्ये मराठी ओव्या किंवा श्लोक जास्त संख्येने घेतले आहेत. उपासना अधिक अर्थवाही व्हायला त्याचा उपयोग होईल असे वाटते.

ग्रामीण भागात तसेच इंग्रजी माध्यमात शिकलेल्या विद्यार्थ्यांसाठी या पोथ्यांचा वापर करताना सर्व श्लोकांखाली दिलेला प्रमाण मराठी भाषेतला अर्थ कदाचित अध्वर्यूना अधिक सोप्या भाषेत सांगायला लागेल. त्या वेळी त्यांनी छापील मजकूर न वाचता स्वतःच्या शब्दात अर्थ सांगण्याचे स्वातंत्र्य जरूर घ्यावे. तथापि, थोडा सराव करून घेतला तर ग्रामीण भागातील मुलेही संस्कृत मंत्र म्हणू शकतात असा अनुभव आहे. त्यामुळे संस्कृत मंत्रात शक्यतो बदल करू नये.

प्रौढ सदस्यांसाठी केलेल्या पोथीमध्ये दिलेली गद्य प्रार्थना प्रबोधिनीच्या कोणत्याही विभागात काम करणाऱ्या सदस्यांना म्हणता येईल अशा समावेशक आशयाची आहे. त्याशिवाय विभागानुसार त्यांना उचित अशा आशयाची एखाद्या परिच्छेदाची भर त्या त्या विभागाने घालण्यास हरकत नाही. प्रबोधिनीशिवाय अन्य एखाद्या संस्था-संघटनेमध्येही गद्य प्रार्थनेत किरकोळ बदल करून वर्षारंभाची ही पोथी वापरता येईल, कोणत्याही संघटनेमध्ये ही पोथी वापरून त्यांनी आपल्या ध्येयाचे वार्षिक स्मरण केल्यास ते भारतीय परंपरेला अनुसरून होईल. सर्वच सामाजिक व सार्वजनिक कामे वा पोवीतल्या चिंतनानुसार आध्यात्मिक पावावर दृढ होत गेली तर राष्ट्रघडणीला अनुकूल असे बदल सर्व ठिकाणच्या कार्यकर्त्यांच्या मनोभूमिकेत होऊ शकतील असा विश्वास वाटतो.

**********************************************************************************************************

प्रस्तावना (पहिली आवृत्ती)

वेद नि ऋषी यांची श्रीमंत परंपरा आपल्याला लाभली आहे. सहज प्रतीत होणाऱ्या द्वैताच्या पलीकडच्या अद्वैताचे दर्शन घ्यावे ही आमच्या तत्त्वज्ञानाची सांगी आहे. ज्ञान आणि विज्ञान, अध्यात्मविद्या नि भौतिकविद्या यांचा समतोल राखणे नि अभ्युदय-निःश्रेयसाची चरमसीमा गाठणे हा व्यक्तिजीवनाचा परमोच्च बिंदू आहे. उन्नत व्यक्तिजीवन आणि उन्नत राष्ट्रजीवन यातील द्वैत पुसले जाऊन तेथे समभाव निर्माण व्हावा हे आम्हाला साध्य करावयाचे आहे. त्यासाठी शिक्षण ! स्वामी विवेकानंद म्हणत असत, “Education is the manifestation of perfection already in man, and religion is the manifestation of Divinity already in man” “शिक्षण म्हणजे काय? मानवात मुळातच असलेल्या परिपूर्णतेचे प्रकटन करणे म्हणजे शिक्षण; आणि धर्म म्हणजे काय? तर मानवात मुळातच असलेल्या ईश्वरी तत्त्वाचे प्रकटन करणे म्हणजे धर्म !”

निराळ्या शब्दात आमचे ध्येय ‘धर्मसंस्थापना’ करणे हे आहे. स्वतःच्या हृदयातील देव जागृत करणे आणि त्याबरोबर इतर बांधवांच्या हृदयातील परमेश्वर जागृत करणे याचे नाव ‘धर्मसंस्थापना।’ ही धर्मसंस्थापना करणे हे आमचे परंपरागत राष्ट्रीय ध्येय आहे.

या दृष्टीने विद्योपासनेला तपस्येचे पावित्र्य यावे, विद्यारम्भास सुसंस्कारांचे सामर्थ्य यावे, विद्यार्थ्याला नचिकेत्याची निष्ठा प्राप्त व्हावी नि विद्यादान करणाऱ्याला वेदव्यासांची विशाल दृष्टी लाभावी आणि यातून व्यष्टी, समष्टी आणि परमेष्टी यांचे अद्वैत प्रत्ययास यावे वासाठी ज्ञान प्रबोधिनीत वर्षारम्भाच्या अथवा श्रावणीच्या परंपरेचा स्वीकार करण्यात आला आहे.

———गिरीश श्री. बापट

*********************************************************************************************************************

ज्ञान प्रबोधिनी वर्षारंभ उपासना (प्रौढ वयोगटासाठी)

अध्वर्यू – हरिः ॐ

उपासक – हरिः ॐ

अध्वर्यू – ॐ

उपासक – ॐ

अध्वर्यू – ॐ

उपासक – ॐ

अध्वर्यू – आज आपल्या विभागाची वर्षारंभ उपासना आहे. विविध रूपांतील देवीचे स्मरण व वंदन करून आजच्या या उपासनेला आपण सुरुवात करूया.

(★ अन्य संस्थांनी येथे ‘विभागाची’ या शब्दाऐवजी ‘संस्थेची’ म्हणावे.)

अध्वर्यू आणि पाठोपाठ उपासक –

या देवी सर्वभूतेषु बुद्धिरूपेण संस्थिता ।
नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नमः ।। (दुर्गा सप्तशती ५.२०)
जी देवी भूतमात्रात बुद्धिरूपात राहते।
नमस्कार तिला आमुचा नमस्कार नमो नमः ।।
या देवी सर्वभूतेषु शक्तिरूपेण संस्थिता ।
नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नमः ।। (दुर्गा सप्तशती ५.३२)
जी देवी भूतमात्रात शक्तिरूपात राहते।
नमस्कार तिला आमुचा नमस्कार नमो नमः ।।
या देवी सर्वभूतेषु लक्ष्मीरूपेण संस्थिता ।
नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नमः ।। (दुर्गा सप्तशती ५.५६)
जी देवी भूतमात्रात लक्ष्मीरूपात राहते।

नमस्कार तिला आमुचा नमस्कार नमो नमः ।।
चितिरूपेण या कृत्स्नम एतद व्याप्य स्थिता जगत ।
नमन्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नमः ।। (दुर्गा सप्तशती ५.७८)
विश्वाला व्यापनी पूर्ण जी राहे दिव्य चेतना ।
नमस्कार तिला आमुचा नमस्कार नमो नमः ।।

अध्वर्यू – सर्व विश्वाला व्यापून राहिलेल्या दिव्य चैतन्यशक्तीला ईश्वर किंवा ब्रह्म असेही म्हणतात. त्या ईश्वराच्या तेजाचे पुढीलप्रमाणे वर्णन केले आहे

अध्वर्यू आणि उपासक –

न तत्र सूर्यो भाति, न चन्द्र-तारकम् नेमा
विद्युतो भान्ति कुतोऽयम् अग्निः।
तम् एव भान्तम् अनुभाति सर्वम् ।।
तस्य भासा सर्वम् इदं विभाति ।। (कठोपनिषद २.५.१५)

अध्वर्यू – या ईश्वराला सूर्य प्रकाश देत नाही, चंद्र, तारका प्रकाश देत नाहीत, विद्युत्सुद्धा जेथे प्रकाश देत नाही, तेथे अग्नी कसा प्रकाश देणार? त्या ईश्वराच्याच प्रकाशाने सर्व पुन्हा प्रकाशतात, त्याच्याच तेजामुळे ही सर्व शोभून दिसतात.

सर्व तेजांचे तेज असलेला तो ईश्वर आपल्या सर्वांच्या हृदयातही राहात असतो, असे भगवद्गीतेत सांगितलेले आहे.

अध्वर्यू आणि उपासक –

ज्योतिषामपि तज्ज्योतिः, तमसः परमुच्यते ।
ज्ञानं जेयं ज्ञानगम्यं, हृदि सर्वस्य धिष्ठितम् ।। (गीता १३.१७)
जे अंधारास अंधार तेजाचे तेज बोलिले ।
ज्ञानाचे ज्ञान ते ज्ञेय सर्वांच्या हृदयी वते ।। (गीताई १३.१७)

अध्वर्यू – आपल्या अंतर्यामी असलेल्या ईश्वरी अंशालाच आत्मा असेही म्हणतात. या आत्म्याची ओळख आपण करून घेतली पाहिजे आणि त्याची जाणीव आपल्याला सतत राहावी यासाठी प्रयत्न केला पाहिजे.

अध्वर्यू आणि उपासक –

आत्मानं रथिनं विद्धि शरीरं रथम् एव तु ।
बुद्धि तु सारथिं विद्धि मनः प्रग्रहम् एव च ।।
इंद्रियाणि हयान आहुः। (कठोपनिषद १.४.९)

अध्वर्यु – आपले शरीर रथासारखे आहे. इंद्रिये ही घोडयासारखी आहेत; मन लगामाप्रमाणे आहे आणि हे लगाम कोणी जेखेचावयाचे? तर बुद्धिरूपी सारव्याने. पण रथात स्वामी म्हणून कोण आहे? तो म्हणजे आत्मा, या आत्म्याची जाणीव नसली तर रथ आणि सारथी दिशाहीन भरकटत राहतात. हा रख, सारची ही सर्व आत्म्यासाठी आहेत. या आत्म्याची जाणीव सतत जागती ठेवण्याचे प्रयत्न करताना अनेक अडचणी येतील, अनेक संधी आपल्याला खुणावतील. या अडचणी आणि संधींकडे कसे पाहायचे हे पुढील श्लोकात सांगितले आहे.

अध्वर्यू आणि उपासक –

विपदो नैव विपदः संपदो नैव संपदः।
विपद् विस्मरणं विष्णोः संपन्नारायणस्मृतिः ।।

अध्वर्यू – लोक ज्याला विपत्ती म्हणतात ती खरी विपत्ती नव्हे; आपल्या आतील ईश्वराचा विसर पडणे हीच खरी विपत्ती होय; आणि लोक ज्याला संपत्ती म्हणतात ती खरी संपत्ती नव्हे. विश्वातील चैतन्यशक्तीची म्हणजेच ईश्वराची किंवा नारायणाची आठवण सतत राहणे हीच खरी संपत्ती होय. ईश्वराची जाणीव मनात सतत राहण्यासाठी एकेकट्याने स्वतंत्रपणे केलेले प्रयत्न काही वेळा अपुरे पडतात. त्यासाठी ऋग्वेदामध्ये पुढीलप्रमाणे सामूहिक प्रयत्न करायला सांगितले आहेत.

अध्वर्यू आणि उपासक –

सं गच्छध्वं सं वदध्वं सं वो मनांसि जानताम्।
देवा भागं यथा पूर्वे संजानाना उपासते ।। (ऋग्वेद १०.१५३.२)

अध्वर्यू – पूर्व काळात देवांनी ज्याप्रमाणे एकत्रितपणे प्रयत्न करून मोठी कामे यशस्वीपणे पूर्ण केली, त्याचप्रमाणे तुम्हीही काम करताना एकत्र चाला, एकत्र बोला. तुम्हीही परस्परांच्या विचारांशी जुळवून घ्या.

अध्वर्यू आणि उपासक –

समानी व आकृतिः समाना हृदयानि वः।
समानमस्तु वो मनो यथा वः सुत्तहासति ।। (ऋग्वेद १०.१५३.४)

अध्वर्यु – तुमचा आशय एक असो. तुमची हृदये अभिन्न असोत, तुमच्या सर्वांच्या मनात समान संकल्प स्फुरत राहोत. हाच देवत्वाकडे जाण्याचा मार्ग आहे. या मार्गावर व्यक्तीने समूहाचा विचार करायचाः समूहाने राष्ट्राचा विचार करायचा; राष्ट्राने सर्व मानवजातीचा विचार करायचाः सर्व मानवजातीने साऱ्या सृष्टीचा विचार करायचा असतो. अशा विचाराबरोबर कृतीही करावी लागते. त्यासाठी तैत्तिरीय उपनिषदात पुढील व्रते सांगितली आहेत.

अध्वर्यू आणि उपासक –

अन्न न निन्दात, तद व्रतम ।
अन्नं न परिचक्षीत, तद व्रतम्।
अन्नं बहु कुर्यात, तद व्रतम।
न कञ्चत वसतौ प्रत्याचक्षीत, तद् व्रतम्। (तैत्तिरीय उपनिषद ३.७ ते ३.१०.१)

अध्वर्यू – पंचमहाभूतांपासून बनलेल्या सर्व भौतिक गोष्टी आणि भौतिक संपत्ती आपल्या ज्ञानेंद्रियांनी आपल्याला कळत असतात. त्यांना ज्ञानेंद्रियांचे अन्न म्हणायची पद्धत पूर्वी होती. अशा अन्नाची म्हणजे भौतिक संपत्तीची निंदा करू नये. भौतिक संपत्तीचा अव्हेर करू नये. पुष्कळ भौतिक संपत्ती संपादन करावी. आपल्या घरी वसतीसाठी आलेल्या कोणालाही परत घालवू नये. भौतिक संपत्तीचा संग्रह अभ्यागताला उत्तमातील उत्तम अर्पण करण्यासाठीच करायचा असतो. हे सारे करणे हेच खरे व्रत आहे. “जोडुनिया धन उत्तम वेव्हारे। उदास विचारे वेच करी।।” हे संतांचे उद्‌गार याच आशयाचे आहेत. उदास म्हणजे उंचावरून पाहिलेले, म्हणजेच व्यापक. अशा व्यापक विचारानेच देवत्वाकडे जाता येते. त्यात सारे सुख ठेवलेले असते.

अध्वर्यू आणि उपासक –

यो वै भूमा तत्सुखम्। न अल्पे सुखमस्ति।
यो वे भूमा तदमृतम्। अथ यद् अल्पं तन्मय॑म् ।। (छांदोग्य उपनिषद ७.२३ व ७.२४.१)

अध्वर्यू – जे भूमा म्हणजे व्यापक आहे, त्यातच सुख आहे. अल्प किंवा संकुचित विचार करण्यामध्ये सुख नाही. जो व्यापक आहे. तोच अमृतत्व मिळवतो. म्हणजे आपल्या आत्म्याला ओळखून त्याची जाणीव सतत ठेवतो. आणि जे संकुचित आहे त्याचा नाश अटळ आहे. या व्यापक विचारावर स्थिर होऊन आयुष्यामध्ये देवत्वाच्या दिशेने जाण्यासाठी आपल्यामध्ये दैवी गुण विकसित करावे लागतात. भगवद्‌गीतेमध्ये पुढीलप्रमाणे दैवी गुण सांगितले आहेत.

अध्वर्यू आणि उपासक –

अभयं सत्त्वसंशुद्धिः, ज्ञानयोगव्यवस्थितिः ।
दानं दमश्च यज्ञश्च, स्वाध्यायस्तप आर्जवम् ।।
निर्भयत्व मनःशुद्धि योग-ज्ञानी सुनिश्चय
यज्ञ निग्रह दातृत्व स्वाध्याय ऋजुता तप ।।
अहिंसा सत्यमक्रोधः, त्यागः शान्तिरपैशुनम्।
दया भूतेष्वलोलुप्त्वं मार्दवं हीरचापलम् ।।
अहिंसा शांति अक्रोध त्याग सौजन्य सत्यता।
अ-लुब्धता दया भूतीं मर्यादा स्थैर्य मार्दव।।
तेजः क्षमा धृतिः शौचम्, अद्रोहो नातिमानिता।
भवन्ति सम्पदं दैवीम्, अभिजातत्य भारत ।। (गीता १६.१ ते १६.३)
पवित्रता क्षमा तेज धैर्य अद्रोह नम्रता
हे त्याचे गुण जो आला दैवी संपत्ति घेउनी ।। (गीताई १६.१ ते १६.३)

अध्वर्यू – मानवाचा प्रगत मानव म्हणजे देवमानव होण्यासाठी हे दैवी गुणसंपत्तीचे सव्वीस गुण आपल्या अंगी बाणवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. असे प्रयत्न करण्यासाठी विद्यार्थी-दशा संपल्यानंतर प्रौढपणी आपल्या कौटुंबिक आणि सार्वजनिक जबाबदाऱ्या पार पाडताना आपला दिनक्रम संयमित असायला लागतो. त्याचे स्मरण पुढील अभंगातून करूया.

अध्वर्यू आणि उपासक –

नियम पाळावे जरि म्हणशिल योगी व्हावे।
नियम पाळावे जरि म्हणशिल योगी व्हावे ।। ध्रु. ।।
रसनेचा जो अंकित झाला,
समूळ निद्रेला जो विकला,
तो नर योगाभ्यासा मुकला
असे समजावे ।।१।।
जरि म्हणशिल….
रात्री निद्रा परिमित घ्यावी,
भोजनातहि मिती असावी,
शब्दवलाना बहु न करावी,
साधक जीवे ।।२।।
जरि म्हणशिल…
या परि सकलाहार-विहारी
नियमित व्हावे मनि अवधारी
निजरूपोन्मुख होउनि अंतरी
चित्त मग धावे ।।३।।
जरि म्हणशील…

अध्वर्यू – असे नियम पाळल्यामुळे काय घडते ? आपल्या इंद्रियांची आणि त्याबरोबर आपल्या चित्ताची धाव बाहेरच्या दिशेला असते ती अंतर्यामी असलेल्या ईश्वराच्या दिशेने वळते. सारी कामे मग ईश्वरासाठीच होऊ लागतात. आपले चित्त आपण निवडलेल्या कामावर एकाग्र होते. त्यातील छोटी छोटी उद्दिष्टे आपल्याला दिसू लागतात. त्यांचा एकमेकांशी असणारा उघड किंवा लपलेला संबंध उमजू लागतो. रोज कराव्या लागणाऱ्या गोष्टी त्याच त्या असल्या तरीही त्यातील ‘नित्य नवा दिस जागृतीचा’ असा आनंद घेण्याची वृत्ती बळावते. त्यासाठी स्वतःमध्येही निरंतर बदल करत राहण्याची, नवे शिकत जाण्याची प्रेरणा वाढते. ती अधिक सात्त्विक, शुद्ध होत जाते. हा सुद्धा एक प्रकारचा योगाभ्यासच आहे. नव्या वर्षासाठी संकल्प करताना आमच्या कामातून येत्या वर्षात आपली प्रेरणा अधिक शुद्ध व्हावी अशी प्रार्थना आता करूया.

प्रार्थना

राष्ट्रार्य भव्य कृति काही पराक्रमाची।
ईर्ष्या निजांतरि धरूनि करावयाची ।।

खरोखर राष्ट्रहितार्थ
जीवनात पराक्रमाची उत्तुंग कृती घडावी
अशी तीव्र तळमळ मनात धरून
आम्ही एकत्र जमत आहोत.
हे परमात्मन्,
तू याचा साक्षी हो।
भौतिक संपत्तीला
सद्‌गुणांच्या संपत्तीची जोड असल्याशिवाय
ती दैवी संपत्ती होत नाही.
सद्‌गुणविरहित संपत्ती
ही आसुरी संपत्ती होय.
आम्ही दैवी संपत्ती येथे आणू इच्छितो.
जीवनदायी शिक्षण देणे
हा प्रबोधिनीच्या कार्याचा गाभा आहे.
शिक्षण हे केवळ
शाळेत घेता येते असे नाही,
ते जीवनाच्या कोणत्याही क्षेत्रात
काम करीत असताना घेता येते.
तसे जीवनदायी शिक्षण
आम्ही यापुढेही घेत राहू.
आणि खऱ्या अथनि कार्यकर्ते होऊ.
देशापुढे असलेल्या
महत्त्वाच्या प्रश्नांची
सोडवणूक करण्यासाठी
रचनात्मक विधायक कार्याची
स्फूर्ती जागृत करणे,
हा प्रबोधिनीने विविध क्षेत्रांत चालविलेल्या
उपक्रमांचा मुख्य उद्देश आहे.
यासाठी शिक्षण, ग्रामविकसन,
प्राचीन व आधुनिक शास्त्रांमधील
संशोधन आणि औद्योगिक विकसन
या राष्ट्रजीवनाच्या मुख्य अंगांच्या
विविध पैलूंचा प्रत्यक्ष कार्ययुक्त अभ्यास
प्रबोधिनीमध्ये केला जातो.
अशा विविध क्षेत्रांद्वारे
राष्ट्ररचनेसाठी लागणारे
कर्तृत्वसंपन्न युवक-युवतींचे
आणि स्त्री-पुरुषांचे
संघटित बळ निर्माण करणे
हा आमच्या खटपटीचा प्रधान हेतू आहे.
हे परमात्मन्, आमचा हा हेतू, साध्य होवो.
या ध्येयाला आमचे सर्व कार्यच
आम्ही रोज अर्पण करू.
समर्थ श्री रामदास, स्वामी दयानंद,
स्वामी विवेकानंद आणि योगी अरविद
या राष्ट्रपुरुषांचे आत्मिक सामर्थ्य
आमच्या कार्यास उपयोगी होवो,
हे परमात्मन्, तुझ्या आशीर्वादाने
आम्हास अविरत, अथक
परिश्रम करण्याची शक्ती मिळो,
आणि आमचे संकल्प
पूर्ततेला जावोत.

अध्वर्यू – यानंतर त्रिवार ॐकार, ध्यान व गायत्री मंत्राने आपण उपासनेची सांगता करूया.

अध्वर्यू आणि सर्व उपासक

ॐ l ॐ l ॐ l
(२ मिनिटे चिंतन)

ॐ भू l हे पृथ्वी

ॐ भुवः । हे अंतरिक्ष

ॐ स्वः । हे सूर्य

ॐ महः । हे कोटिसूर्य

ॐ जनः । हे आकाशगंगा

ॐ तपः । अनंत आकाशगंगा

ॐ सत्यम् । हे परब्रह्म

ॐ तत्सवितुर्वरेण्यम्
भर्गो देवस्य धीमहि ।
धियो यो नः प्रचोदयात् ।।
या परब्रह्माच्या, देवाच्या
श्रेष्ठ तेजाचे ध्यान करितो.
अमुच्या बुद्धीला तो प्रचोदना देवो.
(तैत्तिरीय आरण्यक प्रपा.१०, अनु. २७)

अध्वर्यू आणि सर्व उपासक

ॐ तत् सत् ।
ॐ तत् सत् ।
ॐ तत् सत् ।
नमस्ते १, २, ३

**************************************************************************************************************