भारतीय भाषांचे भवितव्य काय?(भाग २)

लेख क्र. १७

२१/६/२०२५

आपल्याच भाषांची आपणच कशी बिकट स्थिती करीत आहोत. बरेचदा पालकच आपल्या पाल्यांना इंग्रजी शाळेत पाठवतात. तसेच सरकारही काही ठोस पावले उचलत नाही. त्यामुळे हिंदी, मराठी, बंगाली इ. भाषा हिंग्लिश, मिंग्लिश, बिंग्लिश अशा झाल्या आहेत हे आपण मागच्या भागात बघितले. आता हा भाग आपल्याला सांगतो की संत ज्ञानेश्वर, संत तुलसीदास यांनी त्यांच्या रचनांंमधून भाषा जागृत ठेवल्या. आता आपली जबाबदारी आहे आपल्या भाषा जिवंत ठेवणे. इंग्रजीत शिक्षण घेतले तरी रोजच्या जीवनात मातृभाषेत संवाद साधला पाहिजे. तरच, आपण आपल्या भारतीय भाषा टिकवू शकू.

भारताने अधिकृतपणे चौदा भाषा या राष्ट्रीय म्हणून स्वीकारलेल्या आहेत. आता या भाषांची गर्दी दूर करून महाराज्ञी इंग्रजी त्याऐवजी सिंहासनावर आरुढ होण्याचा संभव दिसतो आहे. त्या दृष्टीने एक पायरी ही इंग्रजीप्रचुर प्रादेशिक भाषांची असेल, त्यानंतर मात्र हिंदी-हिंग्लिश यांना निरोप देऊन इंग्रजीची एकछत्री सत्ता देशात सुरू होण्याची शक्यता आहे. अशीच अवस्था मिंग्लीशची बिंग्लिशची आणि साऱ्याच देशभाषांची होणार नाही का?

हे कार्य इतक्या हुशारीने, कौशल्याने, विशिष्ट रणनीती ठरवून चालले आहे हे आपल्याला जरा बारकाईने पाहिल्यास ध्यानी येईल. देशी भाषांमधील इंग्रजी शब्द वाढवत वाढवत संथपणे चाललेले हे काम आहे. जन्मास आलेल्या बाळाचे ‘बर्थ सर्टिफिकेट’ घेण्यापसून ‘डेथ सर्टिफिकेट’ मिळेपर्यंत सारे जीवन इंग्रजीमय! नंतर वैकुंठावर पोचल्यावरही तेथील गुरुजी असोत, सेवक असोत ते मृताच्या आप्तेष्टांना सागतात, ‘बॉडी’ आता चितेवर घ्या! साध्या गाठीभेटीत आप्तेष्टांचा परिचय करून देतांना ‘हे माझे मिस्टर’ असं म्हणणं कसं प्रशस्त वाटतं, तर ‘या मिसेस’ या शब्दांना प्रतिष्ठा वाटते.’ हे यजमान,’ हा माझा ‘नवरा’ हे शब्द तसे वाटत नसावेत. आता तर सार्‍या महिला झाल्या आहेत मॅडम! महिलांनाही हे संबोधन आवडतं !

बर्थ डे पार्टी, त्यातील ‘हॅपी बर्थ डे टू यू’ गिफ्ट, रिटर्न गिफ्ट, पार्टी मेनू हे शब्द तर रूढ झालेच आहेत, घरी असो, शाळेत असो बर्थ डे सेलिब्रेट व्हायला हवाच. तोही इंग्रजी भाषेतून, इंग्रजी संस्कृतीतून होतो! तसाच व्हायला हवा – त्या केकचे तुकडे ‘कट’ करण्याआधी मेणबत्त्या विझवायलाच हव्यात। केवढा मोठा आनंद त्यात! असा आनंद हिंदू संस्कृतीत नाही! ते बुरसटलेले औक्षण आता कशाला?

भारतीय लोक व संस्कृतीही उदार आहे. त्यामुळे ‘वेष कोणताही असो, भाषा कोणतीही असो, लिपी रोमन असली तरी काय झालं?’ आमचे भारतीयत्व या वरवरच्या गोष्टीत नाहीच, ते तर हृदयात आहे – अशा युक्तिवादामुळे आपली घसरण वेगाने सुरु आहे. त्यामुळे इंग्रजीची मगरमिठी आम्हा भोवती कधी पक्की होईल हे सांगवत नाही. विचार करून पाहा आपण स्वाक्षरी स्वत:च्या लिपीत करतो का? उत्तर प्राय: नकारार्थीच येईल! मातृभाषा आपल्या हृदयसिंहासनावर आरूढ असेल तर तुम्हाला मराठीचा दुर्दम्य अभिमान वाटेल, ज्ञानेश्वर हा मराठीचा मानबिंदू! इंग्रजीला ज्ञानेश्वर निर्माण करता आला नाही. मायमराठीच्या आरंभकाळीच ज्ञानेश्वरीसारखा अलंकार जिने धारण केला ती भाषा मी कशी भ्रष्ट होऊ देईन? ती कशी कोण नष्ट करेल? केली तर आम्हीच ते करू असं दिसतंय.

तुलसीदासांसारख्यानं निर्मिलेलं ‘रामचरितमानस’ साऱ्या जगभर कोटिकोटि लोकांच्या हृदयानंदास आजवर कारण ठरले आहे. ती हिंदी भाषा काय मुमुर्षू आहे? हिंदीभाषिक हिंग्लीशभाषी होऊन हळू हळू हिंदी सोडून इंग्रजीस कवटाळेल? हे शक्य नाही, पण म्हणूनच आधी हिंग्लिशला दूर ठेवता आले तर हिंदी जगेल, शुद्ध ठेवता येईल. तिच्यात घुसून बसलेले व घुसू पाहणारे इंग्रजी शब्द आपण काटेकोरपणे नवे शब्द शोधून हाकलले पाहिजेत. कोणासही घरात घेत गेल्याने अखेर येणार आहे मातृ‌भाषेचं मरण! त्याचं भान ठेवून जर हिंदी साहित्यिक, प्राध्यापक, पंडित, भाषाकोविद व बारा पंधरा कोटी हिंदी भाषिक सावध राहतील तर हिंदी टिकेल, आपली अस्मिता टिकेल. भारतीयत्व अबाधित राहील. नाहीतर, नाहीतर…? आपल्या भाषा या मरु घातलेल्या भाषा ठरत आहेत.

हिंग्लिश स्थिरपद होत जाईल, ७० टक्के पेक्षा अधिक इंग्रजी शब्द तिच्यात रूढ झाले की हळूच नागरी लिपीची अडचण सांगण्यास आरंभ होईल व हे सारे इंग्रजी शब्द मूळ रोमन लिपीत लिहिणे सोयीचे सोपे वाटू लागेल. कोणी तरी सुरवात करेल, संगणकास रोमन लिपी सोयीची, दूर संचारार्थ रोमन लिपी व इंग्रजी अधिक सोयीची वाटू लागेल व हिंदी भाषा व नागरी लिपी कधी भूतकाळात जमा होऊन जाईल हे ध्यानातही यायचे नाही. त्या आफ्रिकन भाषांचे हेच तर झालं ।

स्वातंत्र्य लढ्याच्या आरंभी इंग्रजीचा वापर राष्ट्रभाषेच्या अधिवेशनात सरसकट होत असे कारण भारतातून इंग्रजी शिकलेले सदस्यच तेथे येत असत. इंग्रजी राजाला उद्देशून इंग्रजीत प्रार्थनाही होत असत पण… मग एक दिवस देशी भाषेची अस्मिता जागृत झाली. हिंदीचा राष्ट्रसभेच्या अधिवेशनात प्रवेश झाला. पुढे तर ही राष्ट्रभाषा करण्यासाठी म. गांधीजींनी पुढाकार घेतला. दक्षिणभारत हिंदी प्रचार समितीचे अध्यक्ष स्वतः राजगोपालाचारी होते. त्यामुळे दक्षिणेचा विरोधही नव्हता, हजारोंनी तमिळ हिंदी शिकत होते. पण सुलभ असे हिंदीचे नाना भाषांमधील वापरासाठी कोश व्हायला हवे ते झाले नाहीत. विविध विषयांसाठीची आवश्यक परिभाषा त्या त्या विषयातील पंडितांकडून करवून घ्यायला हवी होती ती कामगिरी झाली नाही. सारी देशभर पसरलेली नोकरशाही हिंदीचा स्वीकार करण्यास राजी नव्हती. पण तरीही काही वर्षे नोकरीतील आवश्यक भाग म्हणून लोक नाईलाजाने तरी हिंदी शिकत होते. पुढे तर हिंदी विरोधी आंदोलन दक्षिणेत उभे राहिले व हिंदी राष्ट्रभाषा होणे राहून गेले. नोकरशाहींना नवीन भाषा शिकण्याची कटकट राहिली नाही. आता वर्षातून एक पंधरवडा हिंदीच्या नावे पाळण्यात येतो पण ते कधी कुणाच्या ध्यानातही येत नाही. बिचारी हिंदी! बिचारी राष्ट्रभाषा! तिच्यासाठी तो पितृपंधरवडा!!

Filpro, edited & translated by Ashvin Kaitabhya – File:Language_region_maps_of_India.svg, CC BY-SA 4.0, https://commons.wikimedia.org/w/index.php?curid=136167811 द्वारा

सार्‍या चौदाही भाषा राष्ट्रभाषा आहेत हे आम्ही सोयीस्करपणे म्हणत राहिलो पण कोणतीच भाषा त्या त्या राज्यापुरतीही खर्‍या अर्थनि सिंहासनारूढ होताना दिसत नाही. त्याचं कारण सर्वत्रच इंग्रजीने सर्व प्रादेशिक भाषांना शह दिला आहे. परिणामी हिंदी नाहीच पण मराठी, कानडी, तेलगु, तमीळ, बंगाली वा पंजाबी, गुजराथी वा ओडिया कोणतीच भाषा खर्‍या अधनि राज्यभाषापदीही सन्मानपूर्वक बसतांना दिसत नाही. मग राष्ट्रभाषापदी येणं दूरच! अखिल भारतात परिभाषा निर्मितीसाठी परिश्रम नाहीत, त्यासाठी पैसा नाही, पण सव्वाशे कोटी भारतीयांना इंग्रजी शिकवण्यास प्रचंड खर्चाची योजना केंद्र शासनाने हाती घ्यावी पण गत ६० वर्षात हिंदीचे हजार – दीडहजार शब्द शिकविण्यात ते असमर्थ ठरावे ह्याला काय महणावे?

‘कॉर्पोरेट कल्चर’ मधे अडकलेल्या या देशात कल्याणकारी राज्याचे नुसते नाव उरले आहे. ‘यूथ कल्चर’ नावाचं नवंच प्रस्थ दूरदर्शनादी माध्यमांनी उभं केलं असून तेही हिंग्लिश मिंग्लिश अशा संकरित उपक्रमांनी ओतप्रोत भरलं आहे! पत्रकारही खेडुतांसाठी ‘अ‍ॅग्रो वन’ चालवत आहेत, ‘अ‍ॅग्रोवन’ हे आम मराठी शेतकऱ्यांना कळायला सोप असं नाव! ‘उत्तम शेती’ हे त्या बिचार्‍याला काय कळणार? दैनिकाची पुरवणी ‘टुडे’च हवी ‘अद्यतन’ किंवा ‘आज’ कसं कळणार?’ श्री. प्रभु जोशी हे नवनीत (डिसेंबर 2011) मध्ये म्हणतात,”ज्या राष्ट्राला स्वत:ची अशी भाषा नाही तो देश सांस्कृतिक दृष्ट्या पोरकाच म्हणायला हवा.”

स्वत:च्या भाषेत आपल्या देशाचे भविष्य घडवणार्‍या चीन, जपान यासारख्या देशांनी विसाव्या शतकातील सारे ज्ञान-विज्ञान स्वत:च्या भाषांमध्ये आणून सर्व क्षेत्रात अग्रेसरत्व टिकवले आहे. ते अजिंक्य होऊ पहाणारे देश आहेत. आम्ही मात्र ‘कानडी शिकून काय चपरासी व्हायचय का?’ ‘मराठी शिकून काय कारकून व्हायचे काय?’ असले प्रश्न विचारून मातृभाषांचा घोर अपमान करतो आहोत व त्याच बरोबर युवकांचे मनी एक न्यूनगंडही उत्पन्न होतो आहे तो वेगळाच! त्यांनी इंग्रजी येत नाही म्हणून काय आत्महत्या करावी?

देशभर दक्षिण-उत्तर-हिंदी चित्रपट निर्मिती होत आली आहे. हिंदी चित्रपट निमति पैसेही यथेच्छ कमावत आहेत. हिंदी गीते देशभर लोकप्रिय होत आहेत. हे जर होते आहे तर बाजारात येणारी सारी उत्पादने इंग्रजी नावे घेऊन, रोमन लिपीतच का दिसतात? नव्या उद्योजकाला नवीन उद्योग सुरु करताना, उद्योगाला छानसं इंग्रजी नाव देऊनच उद्योग उभा करावा असं का वाटते? नागरी लिपीतील नाव ग्राहकाला वाचता येणार नाही म्हणून? ग्रामीण माणसाला सरसकट येते रोमन लिपी? कळते का इंग्रजी?

अडीच हजार अक्षरचिन्हे असणारी चित्रलिपी ज्यांच्या वाट्याला आली आहे असे चिनी व जपानी आपल्या लिपीला व भाषेला चिकटून राहतात आणि तरीही प्रगतीची घोडदौड करू शकतात हे आपण पाहतो पण केवळ पन्नासच मुळाक्षरे असणारे मराठी, हिंदी, गुजराथी, बंगाली मात्र आपापल्या लिपीस व भाषेस वाळीत टाकू पहात आहेत हे कशाचे लक्षण? स्वातंत्र्याचं?

‘कृण्वन्तो विश्वम् आंग्लम्’ म्हणत एक विजिगीषा बाळगून निघालेले आपले विदेशी राज्यकर्ते गत पासष्ट वर्षेही म्हणजे आमच्या स्वातंत्र्याच्या काळातही, आमच्यावर अधिसत्ता गाजवतच आहेत – राष्ट्रकुला द्वारा, आपल्या भाषा-लिपीद्वारा. कृण्वन्तो विश्वमार्यम् (कृण्वन्त: विश्वम् आर्यम्) असे ज्यांच्या पूर्वजांचे भव्य स्वप्न होते ते आम्ही आज कोणते स्वप्न पाहतो आहोत? सार्‍या ‘इंडियात’ रोमन लिपीत कारभार चालला आहे. इंग्रजी भाषा घराघरातील बालकांच्या कानावर जन्मापासून, अन् अगदी जन्मपूर्वकालापासून पडते आहे आणि वृद्ध झालेल्या सतराशे साठ देशी भाषांना आपण मूठमाती देऊन मोकळे झालो आहोत?

हे भीषण स्वप्न साकार होण्यापूर्वीच जागे होऊया. अत्यंत शास्त्रशुद्ध अशी आपली लिपी व विश्वातील परिपूर्ण व्याकरणाची स्वामिनी जी गीर्वाणवाणी, संस्कृत भाषा, तिच्या आधारे आपापल्या भाषांना हवे असणारे विज्ञानतंत्रज्ञानातील नवे प्रतिशब्द घडवूया. ते वापरूया व म्हणूया, ‘जरि हजार आमुच्या भाषा, प्रगतीला पोषक बनती’. संस्कृत भाषेने उत्तर भारतीय भाषा संपन्न होत आल्या आहेत त्याचप्रमाणे दक्षिणेतील चारही भाषांनी संस्कृत मधून भरपूर शब्दसंपदा घेतलेली आहे. सारे महान आचार्य शंकराचार्य, मध्वाचार्य, निंबार्काचार्य, रामानुजाचार्य इ. दक्षिणेने दिले आहेत तसेच चिन्मयानंद, स्वामी दयानंद, स्वामी रंगनाथानंद हे सारे नवे चतुर्थाश्रमी पंडित दक्षिणेतून आले व सार्‍या देशाचे झाले. हे सारेच्या सारे दक्षिणी संस्कृतज्ञ आहेत. संस्कृत भाषाभाषी अधिक दक्षिणेतच आहेत. संस्कृतमधून दैनंदिन सारा जीवन व्यवहार करणारी गावे कर्नाटकातील आहेत, संस्कृत माध्यमाची गुरुकुले दक्षिणेत आहेत, आजही! त्यामुळे संस्कृतच्या आधाराने, स्वभाषा समृद्धीसाधून, संस्कृतमधूनच सर्वांना समान परिभाषा विज्ञान तंत्रज्ञानार्थ निर्माण करून, आपल्या प्राचीन भाषा अद्ययावत् करूया, परस्परपूरक करूया, त्यांचा अपमृत्यू टाळूया व इंग्रजी भाषेचाही शक्य तेवहा उपयोग करून घेऊया. पण इंग्रजीस आपापल्या भाषापेक्षा वरचढ होऊ देऊन मातृभाषांची मृत्युघंटा वाजण्याचा धोका आजच ओळखूया, दहा कोटी मराठी माणसांची मातृभाषा मरेल? १५ कोटींची हिंदी अस्ताला जाईल? ५ कोटींची गुजराथी इतिहासजमा होईल? ओडिया, बंगाली, आसामी, तमिळ, तेलगू, मल्याळम् अन् कानडी कालबाह्य होतील?

छे छे! आपण सर्वशक्तिनिशी त्यांना वाचवू या, आमच्या संपन्न मातृभाषांचे संरक्षक होऊ या।