माधव माली एक सयाना- अभंग क्रमांक ८

माधव माली एक सयाना । अंतरिगत रहै लुकाना ॥ धृ ॥
आपै बाडी आपै माली । कली कली कर जोडै ।
पाके काचे काचे पाके । मनिमानै ते तोडै ॥ १ ॥
आपै पवन आपै पाणी । आपै बरिषै मेहा ।
आपै पुरिष नारि पुनि आपै । आपै नेह सनेहा ॥ २ ॥
आपै चंद सूर पुनि आपै । आपै धरनि अकासा
रचनहार विधि ऐसी रची है । प्रणवै नामदेव दासा ॥ ३ ॥

१९७७-७८ साली माननीय आप्पा त्रिवेंद्रम आणि कन्याकुमारीच्या दौऱ्यावर जाऊन आले. तिथून आल्यानंतर केरळ आणि पंजाब या दोन राज्यांमधून सर्व पक्षांना आणि संघटनांना कार्यकर्ते मिळतात म्हणून त्रिवेंद्रम, पुणे, चंडीगढ अशा रेषेमध्ये प्रबोधिनीची केंद्रे असावीत अशी कल्पना बैठकीं मधून ते मांडत असत. तेव्हापासून पंजाबचा विषय त्यांच्या डोक्यात बहुदा कायमच असावा. त्यानंतर एक-दोनदा नामदेवांची ६१ पदे गुरू ग्रंथसाहेब मध्ये आहेत, तर आपल्या भजनात सुद्धा आपण इतर अभंगांबरोबर नामदेवांची हिंदी पदे का नाही म्हणायची? असे त्यांनी विचारले. त्यावर कोणीच काही स्पष्ट प्रतिसाद दिला नाही. मग पुढच्या वर्षी मला म्हणाले की तुम्ही नामदेवांचे चरित्र सांगितले आहे. आषाढीच्या भजनात तुमच्या दलाने नामदेवांचे हिंदी भजन म्हणायला काय हरकत आहे? त्यांनी पुन्हा एकदा आठवण केली; सराव चालू झाला का? तेव्हा मग मी आप्पा बळवंत चौकात जाऊन नामदेवांच्या हिंदी पदांचे पुस्तक घेऊन आलो.  त्यात दिलेला अर्थ न पाहता, त्यातल्या त्यात ज्या पदाचा अर्थ मला समजला, ते पद आम्ही निवडले आणि सराव सुरू केला. हिंदी पद असल्याने दलातील एक एक सदस्य गळत गेला आणि शेवटी मी एकट्यानेच, निरूपण करून, मी लावलेल्या चालीत, हे पद १९७९ च्या आषाढी एकादशीला सांगितले.

माधव माली एक सयाना – माधव म्हणजे कृष्ण हा एक सयाना म्हणजे शहाणा किंवा चतुर माळी आहे.

अंतरिगत रहै लुकाना – तो सगळ्यांच्या अंतःकरणात लुकाना म्हणजे लपून राहिलेला आहे.

आपै बाडी आपै माली – तो स्वतःच बाडी म्हणजे विश्वाचे विशाल उद्यान बनला आहे आणि तो स्वतःच त्या उद्यानातला माळी आहे.

कली कली कर जोडै – त्या उद्यानातील प्रत्येक झाडावरील प्रत्येक कळीची एक एक करून तो स्वतंत्रपणे जोपासना करतो आहे.

पाके काचे काचे पाके – त्या प्रत्येक कळीची फुले होऊन फळे होईपर्यंत, कळी उमलण्यापूर्वी किंवा उमलल्यावर, किंवा फळ कच्चे असताना किंवा पिकल्यावर, कच्चे आहे की पिकलेले याचा विचार न करता –

मनिमानै ते तोडै – (कच्ची किंवा पिकलेली फळे) तो मन मानेल तसे तोडत असतो. कोणते फळ तोडायचे हे तो कसे ठरवतो हे त्याचे त्यालाच माहीत.

आपै पवन आपै पाणी – ढग घेऊन येणारा वारा तो स्वतःच आहे आणि ढगातून येणारा पाऊसही तो स्वतःच आहे.

आपै बारिषै मेहा – एवढेच काय तर ते पावसाचे पाणी बरसणारे मेहा म्हणजे ढगही तोच आहे.

आपै पुरिष नारि पुनि आपै – या विश्वाच्या उद्यानात विहार करणारे सर्व पुरुष तो स्वतःच झालेला आहे आणि पुन्हा नारि म्हणजे स्त्रिया देखील तोच झालेला आहे.

आपै नेह सनेहा – १) तो स्वतःच ‘सनेहा’ म्हणजे प्रेमी जन आणि ‘नेह’ म्हणजे त्यांच्यामधले प्रेम बनला आहे. किंवा २) तो स्वतःच ‘नेह’ म्हणजे शृंगार आणि ‘सनेहा’ म्हणजे वात्सल्य या स्त्री-पुरुषांमधील भावना बनला आहे. (विविध कोशांमध्ये पाहिल्यावर १) व २) हे दोन्ही अर्थ होऊ शकतात असे लक्षात आले. मला व्यक्तिशः पहिला अर्थ पुरेसा वाटतो.)

आपै चंद सूर पुनि आपै – तो स्वतःच चंद्र बनला आहे आणि पुन्हा स्वतःच सूर्य बनला आहे.

आपै धरनि अकासा – हे उद्यान ज्यावर फुलले आहे ती धरनि म्हणजे पृथ्वी, आणि अकासा म्हणजे आकाशही तो स्वतःच बनला आहे.

रचनहार विधि ऐसी रची है – रचनहार म्हणजे निर्माणकर्ता. विधि म्हणजे ब्रह्मदेव. त्या ब्रह्मदेवाने ही अशी सगळी सृष्टी निर्माण केली आहे.

प्रणवै नामदेव दासा – माधवाचा दास नामदेव ‘प्रणवै’ म्हणजे नम्रतापूर्वक त्याला प्रणाम करतो. प्रणाम त्या ब्रह्मदेवामध्ये पण लपलेल्या माधवाला आहे.

महाराष्ट्रातल्या संतांनी सर्व विश्व हे परमेश्वराचीच सगुण साकार मूर्ती आहे, हे सांगणारे अद्वैत तत्त्वज्ञान, ओवी-अभंगांच्या द्वारा मराठीमध्ये सांगितले. नामदेवांनी तेच तत्त्वज्ञान उत्तर भारतातील त्या काळात प्रचलित बोली हिंदीमध्ये राजस्थान, दिल्ली, पंजाब, या भागामध्ये, ज्ञानेश्वरांच्या समाधीनंतर तिथे जाऊन, जवळजवळ तीस वर्षे राहून सांगितले. उत्तर भारतातील रामानंद, कबीर, दादू, गुरु नानक, रविदास हे सगळे संत नामदेवांनंतरच्या काळातले. त्या सगळ्यांवर नामदेवांनी त्यावेळच्या लोकभाषेतून सांगितलेल्या अद्वैत तत्त्वज्ञानाचा प्रभाव पडला. गुरू ग्रंथसाहेबातील ६१ पदांशिवाय नामदेवांची आणखी दीडशे ते दोनशे हिंदी पदे उपलब्ध आहेत. त्या सर्वांतून राम, विठ्ठल, कृष्ण, गोविंद, माधव अशा नावांनी सर्वांमध्ये एकच असलेल्या परमेश्वराची भक्ती सांगितली आहे. हे पद गुरू ग्रंथसाहेबमध्ये समाविष्ट नाही.

पंढरपूरच्या मंदिरातील विठ्ठल मूर्ती म्हणजेच देव आहे, असं मानणारे नामदेव त्याच्याशी बोलत होते, भांडत होते, हट्ट धरत होते, खेळत होते. हे लहानपणचे भक्त नामदेव त्याच्या या सगुण मूर्तीला कोणाचीही दृष्ट लागू नये म्हणून ‘झणी दृष्टी लागो तुझ्या सगुणपणा’ असे एका अभंगात म्हणतात. आणि त्याच्यासाठी व्याकूळ होऊन ‘नामा म्हणे जीवे करीन लिंबलोण’ असे स्वतः च्या प्राणांनीच विठ्ठलाची दृष्ट काढायला जातात. पण ज्ञानेश्वर, विसोबा खेचर असे गुरु भेटल्यावर तेच नामदेव ज्ञानी भक्त झाले. मग वेगवेगळ्या अभंगांमध्ये

‘बाहेरी भीतरी तुजचि मी देखें’

‘आहेसि तितुकें तूचि सर्वागत’

‘बाहेरी भीतरींं पाहतां दिसे एकु । उभा असे व्यापकु पंढरिरावो ।’

असे विठ्ठलाचे वर्णन करायला लागले. आणखी एका अभंगामध्ये म्हटल्याप्रमाणे ‘सर्व जीव तू जालासी आपण’ असे सर्वत्र सर्वांमध्ये परमेश्वर दर्शन झाल्यावर साक्षात्कारी संत नामदेव भागवत धर्माचे प्रचारक म्हणून उत्तर भारतात गेले. तिथल्या लोकांना समजतील अशी उदाहरणे देत सर्वत्र हरी दर्शन घ्यायला शिका आणि मी त्या माधवाला प्रणाम करतो, तसा तुम्हीही प्रणाम करा. असे नामदेव त्यांच्यासमोरील लोकांना या पदातून सुचवत आहेत.

या पदात उद्यानातील झाडाफुलांमध्ये, वारा, पाऊस, पृथ्वी, आकाश अशा महाभूतांमध्ये, स्त्री-पुरुषांमध्ये, त्यांच्या भावभावनांमध्ये आणि आकाशातील ग्रहगोलांमध्ये, या सर्वांमध्ये एकच माधव लपलेला आहे, हेच वरील मराठी अभंगांच्या चरणांमध्ये असलेल्या त्यांच्या अनुभवाप्रमाणे सांगायचे आहे. त्याची लीला किंवा खेळ असा आहे की तो लपलेला असल्यामुळे सगळ्यांना आपण आपल्या शक्तीनेच पिकतो, बरसतो, वाहतो, प्रेम करतो, संतती निर्माण करतो किंवा प्रकाश देतो, असे वाटत असते. नामदेव माधवाला, त्याच्या या सर्व निर्मितीला, आणि सगळ्यांच्या मागे राहून चतुराईने चाललेल्या त्याच्या खेळाला नम्रतेने प्रणाम करत आहेत.

गिरीश श्री. बापट