घेई घेई माझे वाचे – अभंग क्रमांक – ११

घेई घेई माझे वाचे । गोड नाम विठोबाचे ॥ धृ ॥
डोळे तुम्ही घ्यारे सुख । पाहा विठोबाचे मुख ॥ १ ॥
तुम्ही आईका रे कान । माझ्या विठोबाचे गुण ॥ २ ॥
मना तेथे धाव घेई । राहे विठोबाचे पाई ॥ ३ ॥
तुका म्हणे जीवा । नको सांडू या केशवा ॥ ४ ॥

प्रबोधिनीत एक मोठा कार्यक्रम झाला होता. त्याचे स्वतंत्र आठ पानी वृत्त छापले होते. त्यातला एक पूर्ण परिच्छेद कार्यक्रमाच्यावेळी म्हटल्या गेलेल्या पद्यासंबंधी होता. पद्य अतिशय सुरेल झाले होते. त्या परिच्छेदाला शीर्षक दिले होते ‘तुम्ही आईका रे कान…’ स्वतंत्रपणे शीर्षक म्हणून ते फारच अर्थपूर्ण होते. ती ओळ कुठल्या पद्यातली आहे अशी शोधाशोध मी केली. कुणालाच हे पद्य आठवेना. सुरुवातीला अभंग शोधायचे सुचलेच नाही. दोन-तीन वर्षांनी एका भजनामध्ये ही ओळ ऐकायला मिळाली. भजन संपल्यावर लक्षात आले की आपण शोधत होतो ती ओळ एका अभंगातली आहे. पण तेव्हा भजनाच्या वेळी ऐकलेला पूर्ण अभंग आठवेना. मग गाथा धुंडाळून तो अभंग शोधून काढला. या निरूपणमालेतले पहिले दहाही अभंग मी आधी म्हटले होते. आणि मग अर्थावर विचार केला होता. हा अभंग मात्र आधी वाचला, त्यावर विचार केला आणि मग एका भजनाच्या वेळी म्हटला.

प्रबोधिनीतल्या भजनांमध्ये आधी आठ-दहा वर्षे ‘पापाची वासना नको दावू डोळा त्याहुनी आंधळा बराच मी ।’ हा अभंग बऱ्याच वेळा म्हटला होता. यात नकाराचा जोर आहे. पण मग पाहायचे काय ते कळत नाही. काय पाहू नका हे सांगितल्यावर काय पाहा हे ही सांगितले पाहिजे ते या अभंगात सापडले. पापाची वासना निर्माण होईल असे पाहायला नको म्हणून आंधळेपण मागण्यापेक्षा ‘तुम्ही घ्या रे डोळा सुख पाहा विठोबाचे मुख’ ही सकारात्मक दिशा मला आवडली.

अंधश्रद्धा निर्मूलन याच्यात आंधळी श्रद्धा आणि तिचे निर्मूलन असा नकारात्मक आशय दोन वेळा आला आहे. त्यापेक्षा विज्ञानदृष्टी विस्तार हे पूर्ण सकारात्मक काम मला जास्त योग्य वाटते. भ्रष्टाचार निर्मूलन यामध्ये भ्रष्टाचार आणि त्याचे निर्मूलन असा नकारात्मक आशय दोनदा येतो. त्यापेक्षा सदाचार संवर्धन हा पूर्ण सकारात्मक कार्यक्रम आहे. तसा हा अभंग पूर्णपणे सकारात्मक आशयाचा आहे.

‘अपवित्र वाणी नको माझ्या मुखा । त्याहूनी मुका बराच मी’ ॥ यामध्ये ‘अपवित्र वाणी’ आणि ‘नको माझे मुखा’ असा दोन वेळा नकारात्मक आशय आला आहे. त्यापेक्षा ‘घेई घेई माझे वाचे गोड नाम विठोबाचे’ यामध्ये पूर्ण सकारात्मक आशय आहे. आपल्या वाणीने फक्त विठोबाचे नाव घ्यायचे तर मग व्यवहारातली कामे करण्यासाठी बोलायचे की नाही असा प्रश्न येतो. मौनाचे दोन प्रकार सांगतात. एक अंतर्मौन आणि एक बाह्यमौन. आतमध्ये सतत विचाराची आवर्तने चालू नसतील तर बाहेर मौन नसले तरी चालेल. कामापुरते मोजके बोलले तरी चालेल. याला मौनच मानले जाते. पण तोंडातून चकार शब्द येत नाही आणि आत विचारांची वावटळ चालू आहे असल्या मौनाला मौन म्हणण्यात काही अर्थ नाही. तसे मनात सतत रामनामाचा जप चालू आहे आणि प्रकटपणे व्यवहारातले बोलणे चालू आहे असे असेल तर आपली वाणी अखंड रामनामच घेते आहे असे म्हणता येईल. महात्मा गांधींना असा रामनामाचा जप साधला होता. पण असा जप साधण्यासाठी सुरुवातीला मोठ्याने सुद्धा देवाचे नाव घेतल्याचा उपयोग होतो. ‘तनूमनात एक ध्यान’ या पद्याच्या धृपदात चार वेळा ‘हिंदुस्थान’ हा शब्द येतो. ‘हे वीर विवेकानंद’ या पद्यात सुरुवातीला पाच वेळा ‘हे वीर विवेकानंद’ म्हणतात ते जिभेला आधी वळण लागले पाहिजे यासाठी. तसेच आधी विठ्ठल नामाचा जप मोठ्याने केला की तो गोड वाटायला लागतो आणि मग आतल्या आतही तो चालू राहतो.

‘निंदेचे श्रवण नको माझे कानी । बधीर करून ठेवी देवा’ ॥ यामध्ये ‘निंदेचे श्रवण’ आणि ‘नको माझे कानी’ असा दुहेरी सकारात्मक आशय आहे. त्याऐवजी ‘तुम्ही आईका रे कान । माझ्या विठोबाचे गुण ॥’ हे पूर्ण सकारात्मक विधान आहे. समर्थ रामदासांनी परमेश्वराचे वर्णन ‘चोवीस नामी, सहस्त्रनामी । अनंत नामी तो अनामी।’ असे केले आहे. म्हणजे जो जो सकारात्मक शब्द आहे ते देवाचेच नाव आहे. त्यामुळे सर्व व्यक्तींंचे गुणग्रहण आणि सर्व प्रसंगांमधले रसग्रहण करणारे शब्द ऐकत राहावे म्हणजे आपण आपल्या कानांना विठोबाचेच गुण ऐकवत आहोत असे होते.

आपले डोळे, आपले कान आणि आपली वाणी ही शेवटी इंद्रिये आहेत. इंद्रिये ही घोड्यांसारखी आहेत असे म्हणतात, आणि मन त्या घोड्यांचा लगाम आहे. लगाम सैल सोडला की इंद्रिये त्यांना जे नवेनवलाचे वाटते तिकडे धावत, उधळत किंवा भरकटत जातात. लगाम खेचलेला असेल की इंद्रिये मन सांगेल तेच करतात. त्यामुळे वाचेने विठ्ठलाचे नाव घ्यायचे असेल, डोळ्यांनी विठ्ठलाचे रूप पाहायचे असेल आणि कानांनी विठ्ठलाचे गुण ऐकायचे असतील तर मन विठ्ठलाच्या पायाकडे लागले पाहिजे. ते सुद्धा जमेल तेव्हा किंवा सवडीने पाहू असे नाही तर मनाने धावत जाऊन विठ्ठलाच्या पायापाशी स्थिर झाले पाहिजे.

हा सगळा अभंगच मनाला वळण देण्यासाठी आहे. बुद्धीला कळते, मन वळते. या अभंगात बुद्धीचा उल्लेख नाही. मन विठ्ठलाकडे लागले की बुद्धी त्याचेच चिंतन, त्याचेच स्मरण आणि त्याची प्राप्ती कशी होईल याचा विचार करायला लागते. पण मन विठ्ठलाच्या रंगाने रंगून जायचे असेल तर इंद्रियांनाही आधी त्याची गोडी लावावी लागते.

विठ्ठलाचे भजन एकदा ऐकले, वारकऱ्यांचा मेळा एकदा पाहिला की त्यामुळे मनात उमटलेले चांगल्या भावनांचे तरंग काही काळ तरी रेंगाळत राहतात. आधी कोऱ्या मनावर विठ्ठलाच्या नावारूपाचे पहिले ठसे उमटतात. पुढच्या वेळी विठ्ठलाचे ते नामरूप ऐकले, पाहिले, की आधीच्या आनंदाच्या आठवणी लवकर जाग्या होतात. पुन्हा पुन्हा असे अनुभव आले तर मन इतके संवेदनशील होते की केवळ आठवणीनेच किंवा सहज, निर्हेतुक पाहण्या ऐकण्यानेही त्या भावना जाग्या होतात. यासाठी पुन्हा पुन्हा ऐकणे, पुन्हा पुन्हा पाहणे, पुन्हा पुन्हा उच्चारणे अशा जाणीवपूर्वक कृतीने इंद्रियांना विठ्ठलामध्ये गुंतवावे लागते. मग मनही तिथे स्थिर होते. मग बुद्धी त्याच दिशेने विचार करायला लागते. इतर सर्व गोष्टींंचा कंटाळा आणि फक्त विठ्ठलाचीच आवड असे होईपर्यंत ‘घेई घेई माझे वाचे । गोड नाम विठोबाचे ॥’ असा अभ्यास, सराव, कवायत, रियाज, साधना, तपश्चर्या यापैकी जो शब्द आपल्याला रुचेल ते करावे लागते.

‘तुका म्हणे जीवा । नको सांडू या केशवा’ ॥ असा या अभंगाचा शेवट होतो. ‘विठ्ठल टाळ विठ्ठल दिंडी’ मध्ये टाळ आणि दिंडी म्हणजे वीणा, ही भजनाची साधने म्हणजेही विठ्ठल आहेत. पुन्हा ‘विठ्ठल तोंडी उच्चार’. ‘विठ्ठल अवघ्या आवडाला’. केवळ विठ्ठलाच्या भरवशावरच सर्व आयुष्य जगायचे आहे. ‘विठ्ठल बोला विठ्ठल’ असे करत जगायचे आहे. विठ्ठलाचाच नाद लागलेला आहे, विठ्ठलाचेच वेड लागलेले आहे. विठ्ठलाचाच छंद लागला आहे; सुखातही विठ्ठलकृपा असते असे वाटणे आणि दुःखातही विठ्ठल परीक्षा घेतो आहे असे वाटणे, असे सर्व वेळ सर्व कृतींंमध्ये विठ्ठलमय होण्याची अशी स्थिती झाली म्हणजे विठ्ठलाला आपल्या ओंजळीत पूर्ण धरला. यात थोडे दुर्लक्ष झाले तर ओंजळीत साठवलेला विठ्ठल बोटांच्या फटींतून सांडून जातो. म्हणून तुकाराम म्हणतात, आपल्या जीवाला सांगतात की त्या केशवाला कायमसाठी साठवून ठेव, अजिबात त्याच्यावरचं लक्ष ढळू देऊ नको. तरच विठ्ठल तुझा जीवभाव होईल. त्यातच आयुष्याचे सार्थक आहे.

 गिरीश श्री. बापट