वैष्णवजन तो तेने कहिअे, जे पीड पराई जाणे रे;
परदुःखे उपकार करे तोये, मन अभिमान न आणे रे ॥ धृ ॥
सकळ लोकमां सहुने वंदे, निंदा न करे केनी रे;
वाच काछ मन निश्चळ राखे, धन धन जननी तेनी रे ॥ १ ॥
समदृष्टी ने तृष्णा त्यागी, परस्त्री जेने मात रे;
जिह्वा थकी असत्य न बोले, परधन नव झाले हाथ रे ॥ २ ॥
मोह माया व्यापे नहि जेने, दृढ वैराग्य जेना मनमां रे;
रामनामशुं ताळी लागी, सकळ तीरथ तेना तनमा रे ॥ ३ ॥
वणलोभी ने कपटरहित छे, काम क्रोध निवर्या रे;
भणे नरसैयो तेनुं दरशन करतां, कुळ एकोतेर तार्या रे ॥ ४ ॥
प्रबोधिनीमध्ये १९८४ साली गांधी विचार अभ्यास शिबिर झाले होते. त्या शिबिरामध्ये गांधीजींंची आश्रम प्रार्थना म्हटली जायची. त्या प्रार्थनेतला हा अभंग. त्यानंतर वर्ष-दोन वर्ष दर रविवारी प्रबोधिनीतल्या नित्याच्या उपासनेनंतर ही आश्रम प्रार्थनाही म्हटली जायची. काही भाग एकत्र व काही सांगून पाठोपाठ म्हटला जायचा. हा गुजराथी भाषेतला अभंग सांगून म्हणायच्या भागापैकी होता. सात-आठ रविवार नेहमीचे अध्वर्यू नसल्यामुळे तो मला सांगायला लागला. सांगता सांगता या अभंगाचे भगवद्गीतेशी असलेले साम्य लक्षात यायला लागले.
गीतेमध्ये ज्ञानाची लक्षणे सांगायच्या ऐवजी ज्ञानी माणसाची लक्षणे सांगितली आहेत. स्थिर बुद्धीची लक्षणे सांगायच्या ऐवजी स्थितप्रज्ञ व्यक्तीेची लक्षणे सांगितली आहेत. भक्तीची लक्षणे सांगायच्या ऐवजी भक्ताची लक्षणे सांगितली आहेत. कर्मयोगाची लक्षणे सांगायच्या ऐवजी कर्मयोगी माणसाची लक्षणे सांगितली आहेत. ज्ञान, स्थिर बुद्धी, भक्ती, कर्मयोग या विचाराने समजून घेण्याच्या किंवा स्वतः अनुभवण्याच्या संकल्पना आहेत. त्यापेक्षा त्या संकल्पना ज्याच्यात मुरलेल्या आहेत त्या व्यक्तीचे वागणे-बोलणे पाहणे हे बहुसंख्य लोकांना जास्त सोपे जाते. अशा अशा प्रकारे जो वागतो त्याच्यामध्ये ती ती संकल्पना मुरलेली आहे असे समजा; ही सर्वसामान्य लोकांना शिकविण्याची चांगली पद्धत आहे. तसे या अभंगांमध्ये वैष्णव कोणाला म्हणायचे हे सांगण्यासाठी वैष्णव कसा वागतो हे सांगितले आहे. विष्णूचा भक्त तो वैष्णव. पंधराव्या शतकात गुजराथेत नरसी मेहता आणि बंगालमध्ये चैतन्य महाप्रभू यांनी वैष्णव भक्तिमार्गाचा मोठ्या प्रमाणावर प्रचार केला. महात्मा गांधींनी या गुजराथी अभंगाचा भारतभर प्रसार केला. मी भगवद्गीता विसरलो तर हा अभंग माझ्यासाठी ध्रुव ताऱ्यासारखे काम करेल असे त्यांनी म्हटले आहे.
दासबोधातल्या उत्तम पुरुष लक्षणांमध्ये ‘आपणास चिमोटा घेतला । तेणें कासाविस झाला । आपणावरून दुसऱ्याला । राखत जावे ॥’ असे म्हटले आहे. आपल्याला कोणी चिमटा घेतला तरी त्याचा त्रास होतो. याहून मोठ्या दुःखाच्या प्रसंगात मग इतरांना किती त्रास होत असेल असा विचार करून जो इतरांच्या दुःखाचा स्वतः अनुभव घेतो, त्याला वैष्णव म्हणावे. इतरांच्या दुःखाचा स्वतःच अनुभव घेतल्यावर, स्वतःच्या दुःखाचे कारण दूर करायचा जसा आपण प्रयत्न करतो, तसेच इतरांचे दुःख दूर करायचा प्रयत्न करू. मग इतरांचे दुःख स्वतःचे मानून ते दूर करण्यासाठी केलेल्या अशा कामांना उपकार कसे म्हणता येईल? सर्वांमध्ये जो विष्णूला पाहतो तो विष्णूची सेवा करायची म्हणूनच ते दुःख दूर करायचा प्रयत्न करतो. कितीही सेवा केली तरी ती कमीच असते. त्यामुळे सेवेत कोणावर तरी मी उपकार केला असा अभिमान वाटण्यासारखे काही नसते. असा जो दुसऱ्यांचे दुःख दूर करण्यासाठी निरभिमान सेवा करतो तोच खरा वैष्णव आहे.
दुःखी लोकांचे दुःख दूर करावे. ती त्यांची सेवा झाली. त्याशिवाय इतरांना त्यांच्यातील विष्णूरूप ओळखून नमस्कार करीत जावे. सकळ लोकमां, म्हणजे स्वर्ग, पृथ्वी आणि पाताळ या तीनही लोकांमधील, सहुने, म्हणजे सर्वांना, जो आदरपूर्वक वंदन करतो, तोच खरा वैष्णव आहे. समोरून वंदन करायचे आणि मागून निंदा करायची असा काही लोकांचा स्वभाव असतो. त्यांना वैष्णव म्हणता येणार नाही. सगळ्यांना वंदन केल्यामुळे त्यांच्यातले दोष ज्याला दिसतच नाहीत तो खरा वैष्णव. त्यामुळे तो कोणाचीच निंदा करू शकत नाही. निंदा केली नाही की वाणी स्वच्छ राहते. सर्वांना वंदन केले की मन स्वच्छ राहते. आणि इतरांचे दुःख दूर करण्यासाठीच काम केले की ‘काछ’ म्हणजे कर्म देखील सत्कर्म होते. ज्याची वाणी, कर्म आणि मन आपल्या अनुक्रमे चांगले उच्चार, चांगली कृती आणि चांगल्या विचारापासून ढळत नाही, त्याला ते निश्चळ राखता आले. तोच खरा वैष्णव. अशा वैष्णवाला जन्म देणारी आई खरोखरच धन्य आहे.
माझ्याजवळ जे आहे आणि इतरांजवळही जे आहे ते सारे ईश्वराचेच आहे. त्यामुळे त्यात माझे आणि इतरांचे असा फरक ज्याला करता येत नाही त्याची दृष्टी सम, म्हणजे सगळ्यांना सारखेपणाने बघणारी आहे. सगळे देवाचेच आहे आणि देवच आपल्याला देतो ही भावना असल्यावर काहीतरी मिळवलेच पाहिजे असा हपापलेपणा, म्हणजे तृष्णा, ज्याने सोडून दिली आहे तो खरा वैष्णव. असा वैष्णव सर्व स्त्रियांकडे आपली आई म्हणूनच पाहतो. या कडव्यामधल्या दुसऱ्या ओळींमध्ये मजेशीर रचना केली आहे.
जिह्वा थकी असत्य न बोले – खोटे बोलायचा प्रयत्न करून ज्याची जीभ थकून गेली, पण ती खोटे बोलू शकली नाही, त्यामुळे जो खोटे बोलू शकत नाही, तो खरा वैष्णव.
परधन(दुसऱ्याची संपत्ती) नव(नवीन) झाले(धरले) हाथ(हातात) रे – दुसऱ्याची संपत्ती, हाथ झाले, म्हणजे हातात धरण्याचा अनुभव, त्याच्या हातांना, नव, म्हणजे नवीनच असतो. म्हणजे ज्याच्या हातांना दुसऱ्याच्या धनाला स्पर्श करण्याची इच्छा ही झाली नाही तो खरा वैष्णव. खऱ्या वैष्णवाच्या मनातला भाव जिभेपसून हातापर्यंत त्याच्या शरीरातल्या प्रत्येक अवयवातहीे भिनलेला असतो.
ज्याच्या मनाला वाच, काछ, मन, सन्मार्गावर निश्चळ ठेवण्याचा आपला मार्ग सोडून, भलत्या वाटेने जाण्याचा मोह झाला नाही, आणि कोणत्याही वस्तूमध्ये किंवा व्यक्तीमध्ये ज्याचा जीव गुंतला नाही, अर्थात ज्याला मायेचा म्हणजे आसक्तीचा स्पर्श झाला नाही तो खरा वैष्णव. मोह-माया त्याला स्पर्श करू शकत नाही याचे कारण त्याच्या मनामध्ये दृढ वैराग्य आहे. ऐकलेल्या किंवा पाहिलेल्या कुठल्याही गोष्टीबद्दल आकर्षण न वाटणे म्हणजे वैराग्य. रामनाम घेण्यामध्येच, ज्याची ताळी लागी, म्हणजे ज्याला एकतानाता साधली, त्याच्यामध्येच असे वैराग्य निर्माण होऊ शकते. रामनामात मन रमून गेले की वैराग्यही येते, मोहमायेपासून सुटकाही होते आणि सर्व तीर्थक्षेत्रांची, इतरांना तारून नेण्याची शक्तीही त्याच्या शरीरातच प्रकट होते. म्हणजे अशा वैष्णवाचे दर्शन घेतले की तीर्थक्षेत्रांची यात्रा करून जे पुण्य मिळायचे ते मिळून जाते.
वणलोभी, म्हणजे लोभरहित, आणि कपटरहित असा जो असतो, लोभ आणि कपट ज्यामुळे निर्माण होतात ते काम आणि क्रोध ज्याने आपल्या मनातून घालवून दिलेले असतात तो खरा वैष्णव. धृपदातील इतरांच्या दुःखाने दुःखी होण्यापासून चौथ्या कडव्यातील आपल्या मनातील कामक्रोध घालवून देण्यापर्यंत, ज्याचे सर्व आचरण शुद्ध आणि नैतिक झाले आहे, तो खरा वैष्णव. संत नरसी मेहता म्हणतात अशा वैष्णवाचे दर्शन ज्याला झाले, त्याचा तर उद्धार झालाच, म्हणजे तो तर विष्णूच्या पायाशी जाऊन पोहोचणारच. पण त्याशिवाय त्याच्या अेकोतेर, म्हणजे ७१, पिढ्यांचाही उद्धार झाला. म्हणजे थोडक्यात त्याच्या सगळ्या कुळाचा उद्धार झाला असे समजावे.
महात्मा गांधींंनी या अभंगाला ध्रुव ताऱ्यासारखे मानले. यात वर्णन केलेल्या वैष्णवाच्या आचरणाचा आदर्श त्यांनी स्वतःसाठी समोर ठेवला. केवळ स्वतःसाठी नाही तर त्यांच्या आश्रमात राहणाऱ्या सर्वांसाठी एकादश व्रतांच्या रूपाने हा आदर्श समोर ठेवला. काळानुसार व्रतांची संख्या आणि नावे बदलू शकतील. मात्र नरसी मेहतांनी समोर ठेवलेला हा नैतिक आचरणाचा आदर्श कायमस्वरूपी आहे. नैतिक आचरण ही आध्यात्मिकतेची पहिली आणि अत्यावश्यक पायरी आहे. ती कोणालाही टाळता येणार नाही. प्रयत्नपूर्वक नैतिक आचरण केले की व्यक्ती आध्यात्मिक झालीच असे मात्र समजू नये. पण आध्यात्मिक व्यक्तीच्या बाबतीत असे नैतिक आचरण सहज होते. प्रयत्नपूर्वक नैतिक आचरणाबरोबर रामनामाचे स्मरण करण्यात एकतानता साधली की व्यक्ती खऱ्या अर्थाने वैष्णव होते. कै. आप्पांनी शेवटी शेवटी वीर, तत्त्वज्ञ या विशेषणांबरोबर शिखांच्या दहा गुरूंप्रमाणे धर्माग्रणी (म्हणजे नीतिमंत आणि आध्यात्मिक) असे कार्यकर्त्याला तिसरे विशेषण जोडले होते. वीर, तत्त्वज्ञ कार्यकर्ता स्वतःची नैतिक आचरणाची आणि ध्यान-प्रार्थनायुक्त उपासना दृढपणे चालवू लागला, की तो धर्माग्रणी म्हणजे वैष्णव होतो.
गिरीश श्री. बापट