चाले हे शरीर कोणाचिये सत्ते । कोण बोलवीते हरीवीण ॥ १ ॥
देखवी ऐकवी एक नारायण । तयाचे भजन चुको नये ॥ २ ॥
मानसाची देव चालवी अहंता । मीच एक कर्ता म्हणो नये ॥ ३ ॥
वृक्षाचेहि पान हाले ज्याची सत्ता । राहिली अहंता मग कोठे ॥ ४ ॥
तुका म्हणे विठो भरला सबाह्य । उणे काय आहे चराचरी ॥ ५ ॥
हा अभंग जवळजवळ पंधरा-वीस वर्षे भजनामध्ये म्हटला होता. त्याचा अर्थ महत्त्वाचा आहे असे वाटायला १९९२-९३ साल उजाडले. एका युवतीने आवराआवर करताना सापडलेला एक जुना दिवाळी अंक आणून दिला. त्यात ‘मला परमेश्वरी शक्तीचा प्रत्यय कसा आला?’ या विषयावर पंचवीस जणांच्या मुलाखती छापून आल्या होत्या. त्यात आप्पांचीही मुलाखत होती. त्या मुलाखतीमध्ये विवेकानंदांवर कथा लिहिण्याची प्रेरणा कशी झाली, प्रबोधिनीच्या वास्तूसाठी जागा शोधायला मार्गदर्शन कुठून मिळालं, अडचणींंना तोंड देण्याची शक्ती कशी मिळाली, याचे अनुभव सांगत आप्पांनी शेवटी असे म्हटले आहे की ‘माझी इच्छाशक्ती ही परमेश्वराच्याच इच्छाशक्तीचा एक भाग आहे असे मला जाणवत असते. परमेश्वरी इच्छाशक्तीच गुरू किंवा मित्र म्हणून माझे हात बळकट करत असते’. मुलाखत १९७५ सालची. मी वाचली १९९२ साली. पण वाचण्यापेक्षा ऐकण्याने आणि पाहण्याने जास्त विश्वास बसतो, त्यासाठी आणखी दोन भेटींंचे योग यायला लागले.
विवेकानंदांच्या भारत परिक्रमेचं शताब्दी वर्ष १९९२ मध्ये होतं. त्या निमित्ताने विवेकानंद केंद्राने कलकत्ता ते हिमालय ते कन्याकुमारी असे ज्या मार्गाने विवेकानंद गेले त्याच मार्गाने एक रथयात्रा काढली होती. ती पुण्यात आली तेव्हा त्या यात्रेबरोबरचे कार्यकर्ते प्रबोधिनीचे काम बघायला आले होते. शिवापूरलाही गेले होते. त्यांच्याशी बोलताना त्यांना मी विचारले की अशी योजना करण्याचा विचार तुम्हाला कसा सुचला? त्यांचे प्रमुख म्हणाले की आम्ही विचार केला नाही. स्वामीजींंनी आम्हाला प्रेरणा दिली आणि तेच आमच्याकडून यात्रा करून घेत आहेत. काही दिवसांनी विवेकानंद केंद्राच्या अध्यक्षा भेटल्या. त्या म्हणाल्या वर्षभराच्या यात्रेचे नियोजन आणि कार्यवाही करण्याइतके कार्यकर्त्यांचे बळच आमच्याकडे नाही. गावोगावचे लोक त्या त्या ठिकाणचा यात्रेचा कार्यक्रम यशस्वी करतात. स्वामीजीच आमच्याकडून हे काम करून घेत आहेत.
त्यानंतर १९९३ सालच्या गणेशोत्सवात मी तिरुअनंतपुरमला एका शैक्षणिक परिषदेसाठी गेलो होतो. परिषदेच्या कार्यक्रमाचा भाग म्हणून काही संस्थाभेटी होत्या. एका गावात ‘विनोबानिकेतन’ नावाची संस्था बघायला आम्हाला नेले होते. विनोबांच्या भूदान यात्रेत हे गाव ग्रामदान करणारे झाले होते. ग्रामदानाची प्रेरणा क्षणिक असू शकते. ती टिकाऊ करण्यासाठी भूदान यात्रेत त्यांच्या बरोबर असलेल्या एक केरळी संन्यासिनी परिव्राजिका राजम्मा यांना विनोबांनी त्याच गावात थांबायला सांगितले. ग्रामदानाचा खरा अर्थ गावकऱ्यांना समजावून सांगणे हे त्यांचे काम. १९५७ सालापासून त्या तिथेच होत्या. त्या मला १९९३ साली भेटल्या. शेवटची बातमी कळली तेव्हा २०१९ सालीही, वयाच्या ९४ व्या वर्षी त्या तिथेच होत्या. गाव वनवासी भागातले आहे. आणि वनवासी भागातील मुलींंचे वसतिगृह चालविणे, त्यांना शिक्षण देणे, हे त्यांचे मुख्य काम अव्याहत चालू आहे. त्यांच्या भेटीत त्यांनी सांगितले की भूदान यात्राच परमेश्वरी प्रेरणेने सुरू झाली. परमेश्वरानेच विनोबांच्या तोंडून मला इथे राहायला सांगितले आणि परमेश्वर माझ्याकडून काम करून घेत असताना माझ्या स्वभावाचा त्यात अडथळा होणार नाही असा प्रयत्न मी करत असते. प्रथम आप्पांची मुलाखत वाचली. मग विवेकानंद केंद्राच्या कार्यकर्त्यांचा सामुदायिक अनुभव आणि राजम्मांचा व्यक्तिगत अनुभव ऐकायला मिळाला. त्यानंतर मला हा अभंग समजून घ्यायची दृष्टी मिळाली.
सत् म्हणजे असणे. सत्-ता म्हणजे असणेपण म्हणजेच अस्तित्व. ‘कोणाचिये सत्ते’म्हणजे कोणाच्या असण्याच्या किंवा अस्तित्वाच्या आधारावर किंवा बळावर, कोणत्या शक्तीचा आधारावर, आपलं हे शरीर चालते याचा विचार करून पाहा. आपले चालणे, बोलणे, ऐकणे, पाहणे या सर्व क्रिया ज्या शक्तीच्या आधाराने चालतात त्या शक्तीलाच आम्ही हरी, नारायण अशा नावाने पुकारतो. त्या शक्तीची सतत जाणीव ठेवली पाहिजे. ती जाणीव जिवंत राहण्यासाठी तिचे स्मरण किंवा भजन न चुकता केले पाहिजे. विजेचा प्रवाह शॉर्ट सर्किट होऊन तुटला की विजेवर चालणारी उपकरणे बंद पडतात. तसे जिच्या सत्तेने म्हणजेच अस्तित्वामुळे आपले शरीर चालते, त्या शक्तीचे भजन करायचे चुकले, म्हणजे राहिले, की त्या शरीराच्या हालचाली निरुद्देश व्हायला लागतात. म्हणून परमेश्वरी शक्तीच्या योजनेप्रमाणे आपल्या शरीराचा उपयोग होण्यासाठी तिचे भजन करत राहिले पाहिजे.
मानस म्हणजे मन. मानसाची अहंता, म्हणजे आपल्या मनात ‘मी चालतो’, ‘मी बोलतो’, ‘मी पाहतो’ असा जो विचार सतत असतो तो विचार. पण चालणे, बोलणे, ऐकणे, पाहणे या क्रिया जो देव चालवतो तोच देव आपल्या मनातल्या ‘मी करतो’ या विचारालाही बळ देत असतो. ‘मीच एक कर्ता’ म्हणजे मी सर्व काही करतो हा विचार, फसवा आहे. आपण भजन करायचे चुकलो, म्हणजे विसरलो, की मीच सर्व करतो असं वाटायला लागतं. हा विचार आपल्या मनात वरचढ होणार नाही याची काळजी घेतली पाहिजे. ‘कर्ता राम आहे, मी नाही’ हे म्हणायची सवय लावून घेतली पाहिजे.
झाडावरची पाने हलतात ती कशामुळे हलतात? फांदीवर एखादा पक्षी बसला तर त्याच्या बसण्यामुळे पाने थरथरतात. झाडावर बसलेल्या माकडांनी फांद्या हलवल्या की पानेही हलतात. वाऱ्याची झुळूक आली तरीही पाने हलतात. लाजाळू सारख्या झाडाच्या पानांना स्पर्श केला तरीही ती मिटतात. थोडक्यात झाडावरचे पान स्वतःहून हलत नाही. पक्षी, माकड, वारा किंवा हाताचा स्पर्श यामुळे ते हलते. आणि या सगळ्यांच्या मागे ज्या शक्तीचे अस्तित्व आहे, त्या शक्तीमुळेच खरे तर छोट्याश्या पानाचीही हालचाल होत असते. जसा छोट्याश्या पानाच्या अहंतेला म्हणजे ‘मी हलतो’ या विचाराला काही अर्थ नाही, तशी माणसाच्या मनातील अहंताही त्या नारायणाच्या सत्तेवर अवलंबून आहे. मग ती अहंता, म्हणजे ‘मी संकल्प केला’, ‘मी योजना केली’, ‘मी काम केले’, ‘मी बदल घडविला’ असे मीपण, मिरविण्यात काय अर्थ आहे?
जशी आपली त्वचा, स्नायू, हाडे शरीराला आकार देतात, तशी त्या शरीराची रचना क्रियाशील किंवा जिवंत ठेवण्यासाठी आपल्यातील अहंता उपयोगी पडते. त्या अहंतेचा एवढाच उपयोग. ‘डोळ्याने बघतो ध्वनी परिसतो कानी पदी चालतो…’ या बाळबोध श्लोकामध्ये आपल्या सर्व क्रियांचे वर्णन करून शेवटी, ‘…घेतो झोप सुखे, फिरूनि उठतो ही ईश्वराची दया’ असे म्हटले आहे. हेच खरे. या सर्व क्रिया चालू राहण्यासाठी ईश्वराला फार लक्ष घालायला लागू नये, म्हणून त्यानेच शरीरात थोडी अहंता घालून ठेवली आहे. परमेश्वराच्या मोठ्या अहंतेचा छोटासा भाग त्याने प्रत्येक शरीरात ठेवला आहे. ते ते शरीर चालवण्याची जबाबदारी त्या त्या शरीरात ठेवलेल्या अहंतेवर सोपवली आहे.
आप्पांना जो अनुभव आल्याचे मी वाचले, विवेकानंद केंद्राच्या कार्यकर्त्यांकडून आणि परिव्राजिका राजम्मा यांच्याकडून जे अनुभव ऐकले, तसाच अनुभव त्यांच्या आधी तुकाराम महाराजांनाही आला होता. म्हणून ते म्हणतात की विठ्ठल सबाह्य म्हणजे जसा आत आहे तसा बाहेरही भरलेला आहे. तो नाही असे चर म्हणजे सजीव, किंवा अचर म्हणजे निर्जीव, असे काही नाही. चर-अचरामधून त्याला उणे म्हणजे वजा केले तर काहीच शिल्लक राहणार नाही. तो आहे म्हणूनच सर्व आहे. तोच सर्व काही करतो, म्हणून आपल्याला सर्व घडामोडी होताना दिसतात. मी कर्ता आहे असा विचार मनात येणं, ही सुद्धा मनातील एक घडामोड आहे. ती ही तो परमेश्वरच करत असतो.
आरशामध्ये आपले प्रतिबिंब आपल्याला दिसते. केरळात विसाव्या शतकाच्या सुरुवातीला नारायणगुरू या समाजसुधारक संतांनी एक मंदिर स्थापन केले होते. त्या मंदिरामध्ये गाभाऱ्यात मूर्तीच्या ठिकाणी आरसाच ठेवलेला होता. दर्शनाला गेले की समोर आपलेच प्रतिबिंब दिसणार. जोपर्यंत आपली अहंता शिल्लक असते तोपर्यंत आपण खरे व प्रतिबिंब भास असे वाटते. अहंता समूळ नष्ट झाली की मूर्तीच्या ठिकाणी असणाऱ्या आरशात आहे ते मूळ बिंब व आपण प्रतिबिंब असा अनुभव येतो. मी नाहीच, परमेश्वरच आहे हे भक्तीचे शेवटचे टोक. जणू काही आरशाच्या जवळ जवळ जात जात आरशातून आत शिरायचे आहे आणि त्यातल्या बिंबाशी एकरूप होऊन जायचे आहे. हा अनुभव घेतला की ‘देखवी ऐकवी एक नारायण’ हे मनापासून अनुभवातून पटल्यामुळे म्हणता येते. तोपर्यंत ‘…तयाचे भजन चुको नये’ ही उपासना चालू ठेवायची. त्यातून आपली अहंता थोडी थोडी तासली जाते. आरशाच्या अधिकाधिक निकट आपण जातो. आरशातून आत शिरून आरशातल्या बिंबाशी आपण एकरूप कसे, कधी होऊ हे सांगता येत नाही. जे एकरूप झाले त्यांनाही ते कसे झाले हे सांगता येत नाही. पण स्वतः आरशातून पलीकडे पोचल्याचे मात्र संतांनी अनुभवले आहे. म्हणूनच तुकाराम महाराज ‘तुका म्हणे विठो भरला सबाह्य’ असे म्हणू शकतात. ‘हे कार्य व्हावे ही श्रींंची इच्छा’, ‘कार्य सिद्धीस नेण्यास श्री समर्थ आहे’, ‘मी केवळ निमित्तमात्र आहे’, अशी वाक्ये व्यवहारात रूढ झाली आहेत. पण त्यांचा खरा अर्थ अनुभवण्यासाठी ‘कोण बोलवीते हरीवीण’ आणि ‘देखवी ऐकवी एक नारायण’ हा अनुभव मनात स्थिर व्हावा लागतो.
गिरीश श्री. बापट