हिंदू जीवनदृष्टी

लेख क्र. २९

०३/०७/२०२५

मागच्या लेखात ‘सिंधु अथवा सरस्वती संस्कृती हिच हिंदू संस्कृती’ हा विषय वाचला. आता हिंदू संस्कृती म्हणजे काय? तर जीवनाकडे बघायचा वेगळा दृष्टिकोन! हाच विषय ‘समतोल’च्या ‘तत्त्वसप्तक’ विशेषांकात मा. श्री. यशवंतराव लेले यांनी मांडला आहे. ज्ञान प्रबोधिनीची धर्म संस्थापना, जनी जनार्दन ऐसा भाव, हिंदू जीवनदृष्टी, विकास, संघटन,उत्तमता आणि विज्ञानाभिमुखता ही सात तत्त्वे आहेत. त्यातील तिसरे तत्त्व – हिंदू जीवनदृष्टी बद्दल यशवंतरावांनी थोडक्यात पण सोप्या भाषेत समजावले आहे.

“सर्व जगातून आमच्याकडे उत्तमोत्तम विचार यावेत” अशी शुभकामना करणारी आपली परंपरा आहे. विचारसंपन्न होण्याचा हा ध्यास वेदकाळापासूनचा आहे. ऋग्वेदाच्या पहिल्या मंडळात ह्या आशयाचा मंत्र येतो. “आ नो भद्राः क्रतवः यन्तु विश्वतः” असा तो छोटासा मंत्र आहे. आपल्या जीवनात मंगल घटना घडाव्यात अशीच सर्वांची इच्छा असते. मानवमात्राच्या मनातील ही आस पुढील शब्दांत व्यक्त झाली आहे. ‘आम्ही कानांनी कल्याणकारक तेच ऐकू, डोळ्यांनी मांगल्यमय ते ते पाहू; भरभक्कम देहाने आणि तेजस्वी अशा आमच्या इंद्रियांनी आनंद घेत हे जीवन उत्तम प्रकारे संपन्न करू.” ही सदिच्छा कोणत्या ऋचेत व्यक्त होते ? – भद्रं कर्णेभिः शृणुयाम देवाः भद्रं पश्येमाक्षभिर्यजत्राः । स्थिरैरङ्‌गैस्तुष्टुवांसस् तनूभिर्व्यशेम देवहितं यदायुः ॥ या मंत्रातील ‘आम्ही’ म्हणजे कोण ? हे समजावून घेण्यासाठी यजुर्वेद बरा. ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र इत्यादी सर्व समाजघटकांनी युक्त अशा समाजाची ही अभीप्सा आहे. मानवी समाजहितासाठी आम्ही ती व्यक्त करतो आहोत.

आरोग्यसंपन्न देहाने जीवनातील सुखानुभव घेत घेत शतवर्षपर्यंत कृतार्थ होऊन राहावे हीच तर प्राचीन ऋषीमुनींची इच्छा आहे. ते म्हणत, ‘नन्दाम शरदः शतम्’ शंभर संवत्सरे आम्हाला आपापली कर्तव्यकर्म करीत करीत जीवन व्यतीत करावयाचे आहे. ‘कुर्वन् एव हि कर्माणि जिजीविषेत् शतं समाः ।

आश्रमकर्मे करत करत आनंदाने जगण्याची वासना ठेवायची आहे. ‘सारे जग दुःखमय आहे’ असे मानणारी व त्यायोगे नैराश्यपूर्ण आणि निवृत्तीची प्रेरणा देणारी ही भारतीय परंपरा नाही. या जगातील उत्कर्षासाठी प्रयत्नशील राहून; त्याहीपेक्षा उच्च दर्जाचा आनंद मिळवून देणारी; आत्मिक अनुभवाची वाट दाखवणारी अशी भावात्मक श्रेष्ठ जीवनदृष्टी आहे हिंदू जीवनदृष्टी !’ ‘अभ्युदय’ आणि ‘निःश्रेयस’ अशा दोन शब्दांनी ती व्यक्त झालेली आहे. “यतः अभ्युदयनिःश्रेयससिद्धिः स धर्म इति निश्चयः ॥”

ऐहिक उन्नती आणि परमानंद प्राप्त करून घेणे ज्यापासून शक्य होते तो धर्म हे निश्चित. अशा या धर्मात पूजापद्धती, देवदेवता, जपजाप्य इ. कशाचाच उल्लेख नाही. कारण धर्म म्हणजे रिलिजन नव्हे. काही कोश रिलिजन म्हणजे आस्तिक्यबुद्धी एवढाच अर्थ देतात तर वेबस्टरने ‘पूजापद्धती’ असा अर्थ दिलेला आहे. हिंदू जीवनदृष्टीप्रमाणे मूर्ती न मानणारासुद्धा मूर्तिपूजकाच्यासह अभ्युदयाचा आणि निःश्रेयसाचा मार्ग स्वीकारून धार्मिक ठरू शकतो. आत्मा, ब्रह्म, सिद्ध, बुद्ध, राम, कृष्ण, ख्रिस्त, खंडोबा, महंमद अथवा म्हसोबा यांची प्रार्थना, उपासना अथवा पूजा करणारा म्हणजे आस्तिक असे मानण्यात येत असले तरी स्वामी विवेकानंद म्हणतात,”देवावर विश्वास असो वा नसो पण स्वतःवर तुमचा विश्वास नसेल तर तुम्ही नास्तिक आहात! म्हणून स्वतःवर, आपल्या आत्म्यावर विश्वास असेल तर तुम्ही आस्तिक आहात.”

आता वर्णभेद नाममात्र अस्तित्वात आहेत. लिंगभेद कमी होत चालले आहेत. सर्व जातिपंथांच्या स्त्रीपुरुषांनी एकत्र येऊन एका सुरात गायत्री मंत्राचा अर्थासह जप करावा. ‘आमच्या बुद्धीला, सर्व प्रकारच्या ऊर्जांचे एकमेव उगमस्थान असणाऱ्या, भगवान् सूर्यनारायणाने तेजसंपन्न करावे’ अशा आशयाचा हा बहुवचनी मंत्र लक्षलक्ष लोकांनी हृदयपूर्वक म्हणावा हीच आवश्यकता आहे.

चार पुरुषार्थांच्या सिद्धीसाठी चार आश्रमांची व्यवस्था करून ठेवणारा पुरुषार्थी समाज सुदृढ होऊन त्याचे सातत्य टिकावे यासाठी तसेच व्यक्तिगत उन्नती साधून समाजउन्नती व्हावी यासाठी आपली धर्माची व्याख्या करताना द्रष्ट्यांनी ‘यः स्यात् धारणसंयुक्तः सः धर्मः इति निश्चयः।’ असेही म्हणून ठेवले आहे. म्हणजेच व्यक्ती व समाज सुदृढ होऊन त्यांचे भवितव्य उज्ज्वल व्हावे यासाठीची मूल्यसंहिता म्हणजेच ‘धर्म’ असे म्हटले आहे.

आधुनिक विचारांच्या समाजाने स्वीकार करून जिचे पालन करावे अशी ही मूल्यसंहिता म्हणजेच हिंदू जीवनदृष्टी असे अवश्य समजावे.