अर्धशतकाची प्रगतीशील वाटचाल

लेख क्र. ४८

२२/०७/२०२५

आजच्याच दिवशी संत्रिकेला ५० पूर्ण होत आहेत, म्हणून संत्रिकेत झालेल्या कामांचा थोडक्यात आढावा घेतला आहे. संस्कृत भाषेच्या कुशीत भारतीय संस्कृतीचा समृद्ध वारसा विकसित करणे, संस्कृत मधील संशोधन अधिक समाजोपयोगी व विस्तृत पायावर आधारित होणे, अभ्यासाच्या जुन्या परंपरा व नवीन पद्धती यांचा मेळ घालता येणे, संशोधनास व्यापक पायावर आधारित बनवून समाजाच्या गरजा आणि आकांक्षा पूर्ण करण्याची प्रेरणा निर्माण करणे या उद्देशाने संत्रिकेची निर्मिती झाली.

‘संस्कृती’ आधारित संत्रिकेचे महत्वाचे काम म्हणजे ‘पौरोहित्य’. सार्थता, सामुहिकता, शिस्त, समभाव या तत्त्वांवर आधारित पौरोहित्य उपक्रम सुरु आहे. या पौरोहित्य उपक्रमातील महत्वाचे काम म्हणजे स्त्री-पौरोहित्य व मुलींचे उपनयन. २००३ ते २०२१ या २५ वर्षात ८५ पुरोहितांनी संपूर्ण देशात एकूण १,२५,००० संस्कार संपन्न केले. पुरोहितांचे मुख्य कार्य म्हणजे व्यक्तीमध्ये गुणांचे संक्रमण करणे व दोषांचे निरसन करणे, उत्तमतेकडे वाटचाल करवणे, उत्तम व्यक्ती – उत्तम कुटुंब – प्रगल्भ समाज – सुद्रुढ राष्ट्र ही साखळी निरंतर जोडणे.

राष्ट्रवाद अभ्यास मंडळ हा संत्रिकेच्या माध्यमातून झालेला देशप्रश्नावरील व्याख्यानरुपी व चर्चात्मक उपक्रम. पुढे जनतंत्र उद्बोधन मंच व मासिक वैचारिक योजना अशी नामांतरे झाली व थोडे स्वरूपही बदलले. यात अनेक विषयांचा, विविध विचारसरणींचा अभ्यास केला गेला. ऐतिहासिक घटनांकडे बघायचे दृष्टिकोन, तत्वज्ञानातील मुलभूत व अत्यावश्यक संकल्पना, तत्कालिक सामाजिक समस्या इ. विषयांवर ही व्याख्याने होत होती. याशिवाय काही स्मृती व्याख्यानेसुद्धा संत्रिकेत आयोजित होत होती.

संत्रिकेत होणारे एक महत्वपूर्ण काम म्हणजे संशोधन. विविध विषयांवर येथे संशोधन झाले. उदा. पालकाप्यमुनी रचित हस्त्यायुर्वेद, Engineering Geometry of Yadnyakunda and Yadnyamandap. याशिवाय संत्रिकेत तीन विद्यार्थिनींनी वाचस्पती पदवी प्राप्त केली, १)पहिली परदेशी विद्यार्थिनी -Tan Kah Siew,     विषय – The path to Liberation : Nirvana Nibbana – Yoga in Bhagvad Geeta २) वा. आर्या जोशी – श्राद्धातील दान संकल्पना (संस्कृत) ३) वा. मनीषा शेटये – भारतीय संस्कृतीतील कासव ( भारत विद्या)

या सर्व कामाला आवश्यक असते ते ग्रंथालय. संत्रिकेच्या ग्रंथालयात एकूण १५७५३ ग्रंथसंपदा आहे, त्यातील ६०८ हस्तलिखिते आहे, २०२५ विविध रामायणे आहेत, शिवाय उपनिषदे, पुराण, साहित्य, कोश इ. आता हा ग्रंथसंग्रह आपल्याला online सुद्धा बघता येतो. त्याची लिंक खालीलप्रमाणे –

https://granthalay.jnanaprabodhini.org

(डावीकडून) मा. गिरीशराव बापट, मा. यशवंतराव लेले, मा. विसुभाऊ गुर्जर, मा. सुभाषराव देशपांडे (यशवंत गाथा पुस्तक प्रकाशनानिमित्त)
विहीर लोकार्पण कार्यक्रम
बुरुड समाजातील सामूहिक विवाह
डॉ. जयश्री गुणे भारतीय विद्या संशोधिकेच्या उद्घाटनाचा कार्यक्रम