एका शाळेत विज्ञान अध्यापकांची बैठक चालू होती. त्याला मी उपस्थित होतो. प्रत्येकजण आपापल्या कामाचे निवेदन करत होते. किती धडे शिकविले, किती घटक शिकवून झाले. प्रश्नोत्तरांची तयारी कशी करवून घेतली. प्रश्नोत्तरे पाठ करण्याचे फायदे कसे होतात, असे निवेदन चालले होते. व्याख्यानपद्धतीने शिकवण्यापेक्षा चर्चापद्धतीने तास घेतो, काही भाग विद्यार्थ्यांना शिकवायला सांगतो अशी ही निवेदने झाली. बैठकीचा वेळ संपत चालला तसे वृत्तपत्रांमधील, पुरवण्यांधील काय सांगतो, शास्त्रज्ञांच्या भेटीमध्ये विद्यार्थ्यांनी कसे चांगले प्रश्न विचारले, किती विद्यार्थ्यांनी विज्ञान निबंधस्पर्धेध्ये भाग घेतला. किती विद्यार्थी प्रकल्प करणार आहेत, विद्यार्थ्यांना बागेत आणि कारखान्यात काय नेऊन दाखवतो असेही मुद्दे निवेदनात यायला लागले.
चांगल्या उपक्रमशील यशस्वी अध्यापकांची ही बैठक चालू होती. समाजातील रूढ निकषांनुसार त्यांच्या अध्यापनात कुठेही त्रुटी नव्हती. केवळ विज्ञान न शिकविता वैज्ञानिक दृष्टिकोन शिकवण्याची आणि विज्ञाननिष्ठा जोपासण्याची प्रामाणिक धडपड ते करत होते आणि तरीही त्यांची निवेदने ऐकतांना काहीतरी मनाला खटकत होते. किती धडे शिकवले, यापासून किती मुले प्रकल्प करणार इथपर्यंतचा निवेदनांचा प्रवास ऐकताऐकता कोणतेही वाहन घेतल्यावर त्याची पावती करताना मूळ वाहन आणि अँक्सेसरीज् अशी विभागणी केलेली असते, त्याची आठवण झाली. एखादी स्कूटर घेतली की मूळ स्कूटरची कमत अमुकअमुक आणि पुढे अँक्सेसरीजची यादी सुरू होते. साईड गार्डस्, साडी गार्ड, फूट रेस्ट, पेट्रोल लॉक, सीट कव्हर, आरसा, स्टेपनी, रबर अशी यादी होताहोता त्यांची कमत एकूण कमतीच्या१५ ते २०% होते. अध्यापकांची निवेदने ऐकताना त्यांचे मूळ काम विद्यार्थ्यांना परीक्षेची उत्तरे लिहिता येतील अशा रीतीने पाठ्यपुस्तकातील धडे शिकवणे हे आहे, असे वाटायला लागले आणि चर्चात्मक पद्धत, विद्यार्थ्यांनी शिकवणे, प्रात्यक्षिके, भेटी, स्पर्धा, प्रकल्प या अँक्सेसरीज आहेत असे वाटत होते.
सर्वसामान्य शाळांध्ये असे चालू शकेल; परंतु विज्ञान अध्यापक काय किंवा इतर विषयाचे अध्यापक काय, प्रबोधिनीतील अध्यापकांनी आपल्या अध्यापनाची चॅसी ‘देशप्रश्न शिकविणे’ हीच मानली पाहिजे. नियोजन आणि निवेदन करताना कोणत्या देशप्रश्नांचा परिचय करून दिला हेच सांगितले पाहिजे. इतिहासाचे अध्यापक, ‘कोणते देशप्रश्न आम्ही सोडविले’ आणि ‘कोणते सोडवू शकलो नाही’ हे शिकवतील. भूगोलाचे अध्यापक, ‘आमच्या देशाची विशिष्ट रचना आणि स्थितीमुळे कोणते प्रश्न निर्माण झाले आहेत’, हे शिकवतील. ‘कोणते देशप्रश्न सोडविताना विज्ञानाचा उपयोग होतो किंवा केला पाहिजे’, हे विज्ञानाचे अध्यापक शिकवतील. देशप्रश्न मुख्य. विविध पाठ्यविषय, त्या प्रश्नांकडे पाहण्याचे विविध दृष्टिकोन देणारे. विविध अध्यापनतंत्रे या अँक्सेसरीज् आणि धडे आणि परीक्षा ही तात्कालिक साधने हा प्राधान्यक्रम प्रबोधिनीच्या अध्यापकांनी लक्षात ठेवायला हवा.
आपल्या कार्यक्षेत्राची व्याप्ती आणि कृतिकक्षा ठरविली तरी प्रभाव नियोजन यशस्वी होण्यासाठी आमची मुख्य साधने कोणती? आमची मुख्य उद्दिष्टे कोणती? हे कळायला पाहिजे. संजीवन रुग्णालयाच्या मासिक वृत्तामध्ये सरासरी किती खाटा भरलेल्या होत्या? किती रुग्ण बाह्यरुग्ण विभागात येऊन गेले? महिन्याभरात एकूण किती रुग्ण रुग्णालयात उपचारार्थ राहिले? अशी आकडेवारी असते. अध्यापकांनी किती धडे शिकविले याचे निवेदन करण्यासारखेच हे आहे. कामाचे परिपूर्ण निवेदन होण्यासाठी याचे निवेदन होणे अत्यावश्यक आहे; पण या आकडेवारीच्या साहाय्याने कामाच्या यशाचा अंदाज घेण्याचा प्रयत्न करणे म्हणजे अँक्सेसरीज्वरून वाहनाची परीक्षा करण्यासारखे आहे. आधी परीक्षा वाहनाच्या इंजिनाची व्हायला पाहिजे. मग अँक्सेसरीज्ची ग्रामीण रुग्णसेवा, एकात्मिक उपचार हे संजीवन रुग्णालयाच्या निवेदनाचे मुख्य विषय असले पाहिजेत. त्याच्या समर्थनार्थ इतर सर्व आकडेवारी.
आधी कशाचे निवेदन करायचे आणि नंतर कशाचे निवेदन करायचे यावरून आपल्याला काय प्रभाव अपेक्षित आहे हे कळते. आपल्या भवितव्य लेखात आरोग्य या दिशेने सगळ्यात पहिला टप्पा, ‘आयुर्वेद संशोधिकेत एका विद्यार्थ्याची पीएच्.डी. पूर्ण होईल’, असा मांडला आहे. आपण जर का एवढेच मांडले असते, तर ते काही प्रभाव नियोजन होणार नाही; पण त्यापूर्वी आयुर्वेद औषधी संशोधिकेचे हेतू आपण मांडून ठेवलेले आहेत. हे हेतू साध्य करण्यासाठी आपण उत्तम काम केले, तर त्या कामाबद्दल लौकिकदृष्ट्या महत्त्वाची असलेली पीएच्.डी. सहज मिळून गेली पाहिजे, हा विचार त्यामध्ये आहे. आपल्या हेतूंनुसार चाललेल्या कामाचा अधिक प्रभाव पडण्यासाठी कोणीतरी पीएच्.डी. मिळविण्याचाही उपयोग आहे.
क्रीडास्पर्धांध्ये भाग घेण्याचे नियोजन करताना ‘खेळणाऱ्या गटाला एकत्र कामाची संधी मिळेल, एकत्र खेळून एकविचारे कृती करायची सवय त्यांना लागेल’ हा मुख्य हेतू. सराव करताकरता प्रत्येकाला शारीरिक क्षमतांचा विकास करण्याची संधी मिळेल, प्रयत्नांची पराकाष्ठा करण्याचा अनुभव मिळेल, हा त्याखालोखालचा हेतू असला पाहिजे आणि हे सर्व उत्तम झाले असेल तर ‘इतर कुठल्याही संघापेक्षा आम्ही अधिक उत्तम खेळ खेळू शकतो’, हे सहजच दिसू शकेल. ‘झाकली मूठ’ उघडल्यावरही ‘सव्वा लाखाची’च राहते, हे कळण्यासाठी क्रीडास्पर्धेत भाग घ्यायचा असतो. मुख्य उद्देश मोजण्याचे एक साधन क्रीडास्पर्धांधील अजिंक्यपदे आणि पदके आहेत, हे लक्षात ठेवले पाहिजे. प्रभावनियोजन करताना अमूर्त आणि अलौकिक उद्दिष्टे कोणती आणि मूर्त व
लौकिक मापदंड कोणते या दोन्हीचा विचार करून काम करावे लागते. तरच आपल्या नियोजनाचा अपेक्षित प्रभाव पडतो.
सौर भाद्रपद १, शके १९१८
२३.८.१९९६