अंतरिच्या एका स्वप्नाने मूर्तरूप घेतले
कलश-विराजित या वास्तूने यशोनील देखिले ।। ध्रु. ।।
रचिले पायी संकल्पांचे अभंग उत्कट चिरे
सहज मागुती उभी राहिली सिद्धीची गोपुरे
प्राकारांची किमया येथे प्रतिभेलागी स्फुरे
श्रमयज्ञातुनि साफल्याचे पायस हे लाभले ।। १ ।।
रसरसणाऱ्या चैतन्याचे झरे इथे खेळती
आकांक्षी श्वासांच्या वेली गगनाला भिडती
समर्पणाच्या भगव्या ज्वाला होमातून उठती
चित्रशक्तीच्या अवतरणास्तव पुण्यतीर्थ निर्मिले ।। २ ।।
मातृभूमि हे दैवत येथे स्थापियले-पूजिले
त्याग, पराक्रम, सेवा यांचे त्रिदल पदी वाहिले
कर्मसुमातुन ज्ञान-भक्तिचे परिमळ दरवळले
चहू दिशांनी आज विकसती या कमलाची दले ।। ३ ।।
पूर्तीला जातील येथुनी जनमनिची ईप्सिते
घडतिल येथे द्रष्टे, चिंतक, नवयुगनिर्माते
प्रखर तयांची प्रज्ञा वेधिल विश्वरहस्याते
देवत्वाप्रत खचित पोचतिल पथिकसंघ येथले ।। ४ ।।