सळसळणारे धवल तेज हे छाती काढून खडे
गरुडालाही झेप लाजवी गगन तोकडे पडे ।। ध्रु. ।।
सुपुत्र बनलो आज आईचे तोडुन फसवी नाती
स्वर्गसुखाची हसतच देऊ तिजसाठी आहुती
या मातीचे सुवर्ण करण्या श्वसना धार चढे ।। १ ।।
पाजळलेली मशाल हाती उज्ज्वल परंपरेची
चक्र नियतिचे उलटे फिरवू आण तिच्या दीप्तिची
तिच्या प्रकाशी सुगम भासती भेडसावते कडे ।। २ ।।
विश्वाचे हे विशाल अंगण नभ वरती खालती
चंद्रसूर्य तर सखे सोबती तारा बोलावती
तेज तयांचे प्राशुन धावू कल्पान्तापलिकडे ।। ३ ।।
मोहक सुंदर गोड मार्ग हे भुरळ मना घालती
व्यवहाराची सूत्रे पोकळ तोऱ्याने मिरविती
दिमाख त्यांचे दिपवू फेकुनि स्फूर्तिप्रभा चहुकडे ।। ४ ।।
ऊर्मि उमलत्या उरात अमुच्या भरारिची जरि असे
झिजल्यावाचुन सुवास दुर्लभ हेहि मना कळतसे
काट्यांवरूनी आज चालणे, गुलाब येतिल पुढे ।।५।।
भास सर्वही विरुनी गेले ध्येयरूप उजळले
दुभंगलेले राष्ट्र उभविण्या अता विडे उचलले
नव्या प्रभूला पहा पूजिण्या पाउल पुढती पडे ।। ६ ।।