उतरले आकाश पक्षी

शब्द – भावांच्या, सुरांच्या या मनोरम संगमी
उतरले आकाश – पक्षी शारदेच्या अंगणी ।। ध्रु. ।।

मायबोलीच्या घराची, आज हसरी दालने
वेढती गुणगंध चित्ता, स्नेहसुंदर भूषणे
आणि गाभाऱ्यात शोभे मातृभूमी पावनी ।। १ ।।

अमित प्रतिभेचे फुलोरे, अमित रुपी उमलती
ज्ञान – विज्ञानात रमती, दूर क्षितिजे शोधती
गवसता सत्ये नवी, ती हर्ष – पुलकित पर्वणी ।। २।।

तरुण – ताज्या पावलांची, वाढती राहो गती
नित्यनूतन अंकुरांनी, बहरती राहो मती
विश्व हे घडवू शुभंकर, ध्यास सर्वांच्या मनी ।। ३ ।।