डोळे उघडून बघा गड्यांनो

डोळे उघडून बघा गड्यांनो झापड लावू नका
जे दिसते ते असेच का हे उलगडण्याला शिका ।। ध्रु. ।।

भवतालीचे विश्व कोणत्या सूत्राने चाले
कोण बोलतो राजा आणिक कुठले दळ हाले
प्रारंभी जे अद्भूत वाटे गहन, भीतिदायी
त्या विश्वाचा स्वभाव कळता भय उरले नाही
या दुनियेचे मर्म न कळता जगणे केवळ फुका ।। १ ।।

वाहून गेलेल्या पाण्याचा ढग बनतो तो कसा
बीज पेरता कसे उगवते, पाऊस येई कसा
चारा चरूनी शेण होतसे, शेणाचे खत पिका
पीक पेरता फिरूनी चारा, चक्र कसे हे शिका
जीवचक्र हे फिरे निरंतर इतुके विसरू नका ।। २ ।।

अणुरेणूंची अगाध दुनिया दृष्टीच्या पार
सूक्ष्म जीव अद्दष्य किरणही भवती फिरणार
या सर्वांच्या आरपार जी मुक्तपणे विहरे
बुद्धि मानवी स्थिरचर सारे विश्व वेढुनी उरे
विज्ञानाची दृष्टि वापरा, स्पर्धेमध्ये टिका ।। ३ ।।