नव्या ताकदीने नवे स्वप्न पाहू
लढाया नव्या जिंकण्या सज्ज बाहू
आम्ही सूर्यकन्या, नव्हे फक्त छाया
स्वये सर्व सामर्थ्य हे मेळवूया ।। ध्रु. ।।
जिथे ज्योत तेवे स्वयंनिश्चयाची
तिथे अंध तर्का मिळे मूठमाती
विवेके विचारे कृती नित्य व्हाया
स्वये सर्व सामर्थ्य हे मेळवूया ।। १।।
जनी क्षेम चिंतीत सृजनी रमावे
कशाला वृथा भंजनाला भजावे
स्वयंप्रज्ञ तेजाळते दीप बनण्या
स्वये सर्व सामर्थ्य हे मेळवूया ।। २।।
स्वतः उंच जाऊ, समाजास नेऊ
सदा भारतीला जयवंत ठेवू
अशी प्रेरणा लक्ष हृदयी रूजाया
स्वये सर्व सामर्थ्य हे मेळवूया ।। ३ ।।
कवाडे खुली शिक्षणातून व्हावी
प्रभा नारीची स्नेहरूपी दिसावी
असे शेकडो संघ एकत्र येण्या
स्वये सर्व सामर्थ्य हे मेळवूया ।। ४ ।।