स्थितीचे जणु जाहले दास सारे,
श्रमाला कमी लेखती सर्वथा
मनीषा नसे नाही स्पर्धाप्रवृत्ती,
जगा जिंकण्याची न ईर्ष्या प्रथा
शरीरास आवेश कैसा चढेना
सुवर्णक्षणांची घडो साधना ।। ध्रु. ।।
इथे याच मातीत योद्धे नि योगी,
इथे मल्लविद्या, धनुर्वेद अस्त्र,
घडो तेथ क्रीडाप्रयोगी समर्थ
जिथे भीम झाले जिथे वायुपुत्र
पदी वेग बाहूत सामर्थ्य देना ।। १ ।।
जगाची भरारी पुढे झेप घेण्या
मनी संघवृत्ती खिलाडूपणा
सदा विक्रमांची क्षुधा वाढणारी
मिळो सर्व सन्मान वा वंचना
महत्कार्य सिद्धी तपस्येविना ना ।। २ ।।
मनी मुक्त होऊ जनी सर्व मित्र
गुणी नेटके सर्वदा ध्यासबद्ध
जणु गोकुळी श्रीहरी संघसाथी
लढाऊ सदा हासरे नित्यसिद्ध
बलानेच हो धर्म संस्थापना ।। ३ ।।