मनामनातून आज गर्जू दे….

मनामनातून आज गर्जू दे राष्ट्रशक्तीची ललकारी
साद घाल तू निजबाहूंना, मुक्त नभी अन् घेई भरारी ।। ध्रु. ।

गतकाळाचे डिंडिम का हो उगाच पिटता, उरिपोटी
या शतकाचे साहस थिजले? स्फूर्तीला का ही ओहोटी ?
‘भाळी मिरवीन वांझ वारसा’ पुरुषार्थाची का ही कसोटी ?
संभ्रम का हा? बुद्धिभेद का ? विद्ध मनाला तूच विचारी ।। १ ।।

कोटिकरांची उधळण येथे, भूमी सुजला सुफला ही
ज्ञान भक्तीच्या संयोगाने, प्रखर बुद्धिने शोभविली
संघटनेची चिन्गारीही मनामनातच रुजलेली
का ह्याची विस्मृती ? कशास्तव आत्मशक्तीला आव्हेरी ? ।। २ ।।

विचार आणिक विवेक चित्ती, जागृत व्हावी विजिगीषा
डोळ्यांना परि भुलवित आहे, मोहमयी ही अभिलाषा
सत्ता, स्पर्धा, भोग देहिचा, अनिर्बंध ही असे लालसा
धुंद मनाला कशी उमजावी आर्त हाक आहे दारी ।। ३ ।।

देशच माझा माझी भूमी माझे दैवत येथील व्यक्ती
हिच्याचसाठी माझा कण-क्षण, हिच्याकारणी माझी शक्ती
हीच स्पंदने जाण हृदयीची, एक मुखी हो अभिव्यक्ती
संघटनेच्या विराट हस्ते ध्येयसिद्धीचा याग करी ।। ४ ।।