या वास्तूच्या कणाकणाशी जडले माझे नाते
काशी माझी हीच आणखी रामेश्वरही येथे ।। ध्रु. ।।
श्रांत जिवाला, भ्रांत मनाला, करुणाघन बुद्धाचे मंदिर
शरद्रात्रिचे शांत शिवालय आश्वासन हे देते ।। १ ।।
पोलादाच्या नसानसांतुन, थिजला लाव्हा, भिजले वादळ
कोसळत्या बिजलीचे बनले मूर्त शिल्प लखलखते ।। २ ।।
विक्रम-वैभव-वैराग्याच्या, दिग्विजयी दूतांच्या नयनी
आजच जेथे दिव्य उद्याचे दर्शन मजला होते ।। ३ ।।