या माझ्या भारतदेशी

एकजीव उमदे व्हावे जनजीवन गावोगावी
या माझ्या भारतदेशी सुखस्वप्ने फुलुनी यावी ।। ध्रु. ।।

शेतात कोरड्या किसान गाळी घाम
पेरले उगवता हरखुन जाई भान
भरगच्च पिकाने पिवळे होई रान
बळिराजाची परि बाजारी धुळदाण
या भारतभूपुत्राच्या कष्टाला किंमत यावी ।। १ ।।

ही सागरवेष्टित भूमी सुजला सुफला
रखरखीत झाली ओलावा ओसरला
बोडके नागडे होता डोंगरमाथे
आटले झरे अन् सुकलेले पाणोठे
या सुकलेल्या रानात रुजवू या जीवनराई ।। २ ।।

गावात भांडती भाउबंद शेजारी
हे लोक निरक्षर कर्जाने आजारी
भाबडे भोळसट व्यसनांनी बेभान
मागास रिकामे शहरांचेच गुलाम
या गावकऱ्यांच्या गावी नवनवी उभारी यावी ।। ३ ।।

कान्ह्याच्या गावी भरले गोकुळ होते
गोपांच्या मेळी गोवर्धनबळ होते
कालिया पूतना कंस संपले सारे
यमुनेच्या काठी स्वातंत्र्याचे वारे
हरिकथा अवतरो हीच माझिया गावी ।। ४ ।।