विश्वात सर्व शोभो हा हिंदुदेश अमुचा
त्याच्याच पूजनाचा हा ध्यास अंतरीचा ।। ध्रु. ।।
नादातही नद्यांच्या वेदान्तसूक्ति हसती
इथल्या तरुलताही त्यागास पूजताती
सत्यासमोर असणे हा सूर्यफूल बाणा
नचिकेत निर्भयांचा हा हिंददेश अमुचा || १ ||
वारा सदैव गाई स्वातंत्र्यगीत येथे
उत्तुंग पर्वतांचे उन्नत सदैव माथे
भूमी कधी न साही अपमान खंडनाचा
आसिंधुसिंधु अमुचा हा हिंदुदेश अमुचा ।। २ ।।
फुलवीत राही ईर्ष्या ज्वालामुखीत लाव्हा
प्रकटेल भूवरी ती काली सहस्रजिव्हा
परिहार दुर्जनांचा वरदान सज्जनांना
आतंक सप्तखंडी हा हिंदुदेश अमुचा ।। ३ ।।
नीलात नित्य जडवू कर्तृत्ववान तारे
प्रतिभेस जागत्याही नच ठाउकी किनारे
व्योमास व्यापु अवघ्या प्रज्ञेत ही भरारी
चैतन्य नित्य देई हा हिंदुदेश अमुचा ।। ४ ।।
यत्नात स्वप्न पाहू सामर्थ्य वैभवाचे
येथेच अवतरो की ते ब्रह्मतेज साचे
शतसूर्य चेतवोनी चिद्घोष आरतीचा
आकंठकंठ गाऊ हा हिंदुदेश अमुचा ।। ५ ।।