शतकातुनि द्रष्ट्यांचे स्वर निनादती
‘अग्रेसर हिंदुराष्ट्र हिंदुसंस्कृती’ असे स्वर निनादती ।। ध्रु. ।।
इतिहासा ज्ञात असे शौर्य येथले
यज्ञाग्नी सर्वप्रथम येथ चेतले
देशास्तव प्रथम दिल्या इथुनि आहुती ।। १ ।।
परदास्ये होते जधि राष्ट्र घेरले
संतांनी सद्विचार येथ पेरले
स्वत्वाची ठेवियली ज्योत जागती ।। २ ।।
स्वातंत्र्यास्तव कितीक अथक झुंजले
फाशीचे दोर कुणी हसत चुंबिले
रक्ताला चेतविती प्रखर त्या स्मृती ।। ३ ।।
वाढतसे ज्ञान इथे खडक फोडुनी
साकळल्या रूढींचे बंध तोडुनी
प्रतिभेला नित्य नव्या लाभती मिती ।। ४ ।।
ध्यासांचे ज्वालाबन आज उसळु दे
कर्तृत्वातून नवे स्वप्न उमलु दे
संगर हे आम्हि रथी अम्हिच सारथी ।। ५ ।।