आता नाही मी एकटी, मला मिळाल्यात सख्या
आता एकमेळ करू, नाही राहाणार मुक्या ।। ध्रु. ।।
मी ग दारूड्याची बहीण, माझं माहेर तुटलं
माझं दुःख झालं मुकं, पाणी नेत्राचं सुकलं
माझं माहेर होतं मोठं, मोठी माया मोठा झोक
भाऊ दारूत बुडाला, आता हासतात लोक ।। १ ।।
मी ग दारूड्याची नारी, माझं कुंकू झालं फिकं
दावं गळ्यात बांधलं, झालं जनावर मुकं
रोज होती हाणामार रडारड परवड
कुणी सोडवा हो मला, थांबवा की पडझड ।। २ ।।
मी ग दारूड्याची आई, पाळण्याची तुटं दोरी
कोण बाळाला उद्धरी, अवदसा येता घरी
द्वारकेच्या यादवांचा, यदुनाथही हरला
सोनियेच्या द्वारकेचा, ठाव नाही ग उरला ।। ३ ।।