गाव माझे कर्माचे मंदिर 

गाव माझे कर्माचे मंदिर
देव आणि ग्रामस्थ हे स्फूर्तिचे सागर ।। ध्रु. ।।

गावाचा करण्या सर्वांगीण विकास
लहान थोर निष्ठेने करूया प्रयास
एकमेका सावरूया देऊनि आधार ।।१।।

गावाचा चालवूनी शिस्तबद्ध गाडा
वाचू या सतत विकासाचा पाढा
विकासाने फुलवूया सगळी घरदारं ।।२।।

शाळा असावी विकासाची गंगा
शिकावे लहान थोर हाचि मंत्र सांगा
शिक्षणाने येईल गावाला बहर ।।३।।

व्यसने नसावी गावाला मारक
शिक्षणाचे व्यसन व्हावे सर्वांना तारक
संत वचनांनी भ्रम करू दूर ।।४।।

शेतीला पूरक उद्योग करावे
नसावी शत्रूता मन प्रेमाने भरावे
प्रेमाने जोडू मने देऊ एकमेका धीर ।।५।।

गावाची स्वच्छता हीच सर्वांची शान
समूळ घालवूया मनातील घाण
गाव स्वच्छ करूनिया रोग करू दूर ।।६।।