मी परावलंबी नाही

मी माझ्या पायावरती ही उभी नव्याने बाई
मी परावलंबी नाही, मी परावलंबी नाही ।। ध्रु. ।।

या जिण्यास बाईच्या गं हे दळीत होते जोते
माझ्याच घराच्या आत मी बंदिवान का होते?
मी मुक्या गुराच्यावाणी या घरात जखडुन होते
मी कधीच नव्हते बाई ओलांडुन गेले जोते
पण कुणा ठावकी कैशी मी बदलुन गेले बाई ।। १ ।।

घर शेतकऱ्याचे माझे, कर्जाचे झाले ओझे
घरधनी दीनवाणा हा, घर सावकार हा मागे
पिऊनिया धुंद हा बाप्या, शेतात राबते बाई
पोरांची सुटली शाळा, कनवटीस कवडी नाही
इज्जतीत घर राखाया मी बचत गटाला जाई ।। २ ।।

ही इथून मागे सारी बाप्यांची दुनिया होती
बाईला व्यवहाराची माहितीच कसली नव्हती
जरि इथली झाशीवाली, इंदिराबाई ही इथली
तरी घरोघरी एकाकी भारतीय महिला दबली
शिकुनिया मात्र ही आता पुरुषांच्या पुढती जाई ।। ३ ।।

दुनियेच्या पोटामध्ये लई उलथापालथ झाली
कुणि राजा उरला नाही कुणि गुलामदेखील नाही
मांडीला लाऊन मांडी पाटलास धनगर बोले
समद्यांना समदे रस्ते आताच खुले ग झाले
जनतेची आली सत्ता बोलती जाहली बाई ।। ४ ।।

मोलाने राबुन रोज मी कवडीकवडी केली
दरमहा वाचवुन पैसे मी गटात शिल्लक केली
हा मैतरणींचा मेळा मज रोज देतसे धीर
उद्योग नवे मी शिकले, अन्याय रोखले पार ।।
मी पती, मूल, घर, गाव या साऱ्यांची उतराई ।।५ ।।