आव्हान हे ज्योतिंना कि या
मातृभूमिपूजनास या, या प्रकाशसाधनेस या॥ध्रु.॥
भूमि ही महान धर्मधारिणी
तत्त्वरत्नवैजयंतिशोभिनी
अभयदायिनी अनयवारिणी
रुद्र ही सौम्य ही स्नेहदा
सगुण मूर्त आदिशक्ति मोहिनी
चिरयशस्विनी ही प्राणवाहिनी
विजयिनीस वंदिण्यास या॥१॥
दैन्य दुरित स्वार्थ नामशेष हो
धर्मतेज मातृमुकुट शोभवो
अचल भक्ति हो अमित स्फूर्ति हो
धवल कीर्ति हो सर्वदा सर्वदा
अंतरात पेटवू विजीगिषा
जीवनास एकमेव ही दिशा
स्वप्नपूर्ति पाहण्यास या॥२॥
पूर्व दिव्य आज फिरूनि आठवू
रम्य भाविकाल चित्र रंगवू
यत्न सेतुनी मार्ग घडवुनी
ध्येयसाधनेची करू सांगता
एक एक अंकुरास पालवू
तेजसाज आज त्यास लेववू
असित अर्घ्य शिंपण्यास या॥३॥
ध्येयसूर्य ना कधीहि मावळो
की अफाट नभ वरून कोसळो
कंटकातुनी वा फुलांतुनी
मार्ग शोधुनी आक्रमू आक्रमू
थको कधी न त्राण पावलातले
गळो कधी न धैर्य अंतरातले
अमिट हास्य उमलवून या॥४॥